शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी घेतला कळमनुरी-वसमत उपविभागाचा आढावा

हिंगोली(जिमाका), दि. 13: शासन सर्वसामान्य जनतेसाठी अनेकविध योजना राबवित आहे. या सर्व योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावेत, असे निर्देश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघनाताई साकोरे- बोर्डीकर यांनी कळमनुरी व वसमत उपविभागाचा आढावा घेताना दिल्या.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार गजानन घुगे, शशिकांत वडकुते, उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जीवककुमार कांबळे आदी उपस्थित होते. वसमत येथे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यमंत्री श्रीमती साकोरे- बोर्डीकर म्हणाल्या, महिला व बालविकास विभागामार्फत पीडित व गरजू महिला व बालकांसाठी बालसंगोपन योजना, सखी वन स्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन 181, राष्ट्रीय पोषण अभियान यासह अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेची सर्वसामान्य लाभ मिळण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी.

आरोग्य विभागांनी क्षयरोगमुक्त अभियानांतर्गत तपासणीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे संशयित रुग्णांची तपासणीचे प्रमाण वाढवावे. त्यांना योग्य तो औषधोपचार करावा. अवयवदान पंधरवाडा, संजीवनी अभियान, आयुष्यमान भारत योजना, डेंग्यू-मलेरिया अभियान यासारखे विविध उपक्रमांची जनजागृती करुन सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्यावी. ‘ड्राय डे अभियान’ राबवावा. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्तदाब व शूगरच्या गोळ्या मोफत वितरीत केल्या जातात. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला द्यावा. आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची जनजागृती करावी. तसेच अवैध गुटखा विक्रेत्यावर गुन्हे दाखल करावेत, हद्दपारीची कारवाई करावी, अशा सूचना दिल्या.

कळमनुरी उपविभागात सुरु असलेली रस्त्याची कामे दर्जेदार होतील, याची दक्षता घ्यावी. दर्जाहीन कामाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी. ऊर्जा विभागामार्फत पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, मागेल त्याला सौर पंप योजना, कुसूम योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेसह नवीन वीज उपकेंद्राचे प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावेत.

जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक घरांना नळजोडणी झाली पाहिजे. त्याचबरोबर शाळा, अंगणवाड्यांनाही नळजोडणी द्यावी. जलजीवन योजनेंतर्गत प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर पाणी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. जलजीवन योजनेची कामे दर्जेदार करावीत. पाण्याचा स्त्रोत तपासून जलजीवन योजनेची विहिरी घेण्यात यावीत. जलजीवन योजनेच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणेनी जलजीवन योजनेची कामे दर्जेदार व वेळेत करुन नागरिकांना पाण्याची सोय उपलबध करुन द्यावी. या कामात हयगय करणाऱ्या कंत्रादारावर कारवाई करुन त्यांना काळ्या यादीत टाकावे. याबाबत यंत्रणेने हयगय केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे निर्देश राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

स्वच्छ भारत मिशन अभियानांतंर्गत प्रत्येक गावे हागणदारी मुक्त, ओडीएफ प्लस  करावीत. तसेच गावात घनकचरा व्यवस्थापन, शाळेत व सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करावी. प्रत्येक गावात घंटागाडीची सोय झाली पाहिजे. यासाठी प्रत्येक गावातील ग्रामसेवक, सरपंच, जनता एकत्र करुन योजनेची माहिती द्यावी. त्यांच्यामध्ये जनजागृती करावी, अशा सूचना दिल्या.

स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक गावामध्ये हर घर तिरंगा व हर घर स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करुन त्याचा अहवाल सादर करावा. तसेच ज्या गावात स्वच्छतेच्या तक्रारी आहेत. त्या तात्काळ दूर कराव्यात. तसेच आदिवासी विकास विभागाने शासनाच्या विविध योजनेचा लाभ तळागातील लोकांना देण्यात यावा. यासाठी योजनेंची जनजागृती करावी.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची अडवणूक होत असल्याची जनतेची तक्रार आहे. याबाबत शहानिशा करुन सर्वसामान्य लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळवून देण्यात यावा. तसेच ज्या लाभार्थ्यांना स्वत:ची जागा नाही अशा लाभार्थ्यांना पंडीत दीनदयाल उपाध्याय योजनेतून जागा खरेदीसाठी अर्थसहाय देऊन त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ द्यावा, अशा सूचना दिल्या.

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, फळबाग लागवड योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ तळागातील जनतेला उपलब्ध करुन द्यावा. तसेच शेतरस्त्याची, फेरफाराच्या प्रलंबित प्रकरणाची प्रकरणे तात्काळ निकाली काढावेत. तसेच राशन दुकानदाराना व जनतेला नियमित धान्य उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी. याबाबत तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सांगून हे शासन जनतेचे शासन असून गतिमान आणि पारदर्शक आहे. त्यामुळे शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचविण्यात यावेत, असे निर्देशही श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी दिले. कळमनुरी येथील बैठकीच्या शेवटी अवयदानाची शपथ घेण्यात आली.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, महिला व बालविकास मंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी ई-संजीवनी अभियानाचा आढावा घेतला. संशयित रुग्णांवर वेळेत उपचार करावेत. यासाठी वैद्यकीय अधिकारी यांच्या रात्रपाळीवर नियुक्त्या करण्याचे निर्देश दिलेत.

स्क्रीनिंग, एक्स रे, निक्षय मित्र, क्षयरुग्णमुक्त ग्रामपंचायत, राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणांच्या 100 दिवस कार्यक्रमात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सहा महिन्यात 400 ग्रामपंचायती 100 टक्के टीबीमुक्त करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे ठरविले आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आजारांची लक्षणे वेळेत लक्षात आल्यावर वेळेत उपचार सुरू करता येतील. यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवा. मलेरिया मुक्त अभियान, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

शेतकामासाठी जात असलेल्या गुंज येथील महिला मजुरांचा विहिरीत ट्रॅक्टर पडून एप्रिलमध्ये मृत्यू झाला होता. त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी वाढीव गावठाणाचा प्रस्ताव मंजूर करण्याचे आदेश दिले. तसेच घरकुल लाभार्थ्यांना 2 ब्रॉस मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले.  शासकीय अधिकाऱ्यांनी गोरगरिबांची कामे सेवाभावातून पूर्ण करावीत व वेळेत योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. तसेच गरजू व पात्र नागरिकांना वेळेत रेशन कार्ड तात्काळ तयार करून देण्याचे औंढा नागनाथचे तहसीलदार हरिष गाडे यांना दिले.

महावितरण विभागाकडून पारडी येथे तात्काळ वीज वितरण करणारे नवीन खांब बसविण्याबाबत निर्देश दिले.  तसेच वीज वितरण करणाऱ्या तारा ताणून घेण्याबाबत सांगितले. वीज मीटर बसविण्याची तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. गुंज येथील वीज वाहिन्यांच्या तारा ओढून घेण्याचे निर्देश दिले.

या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, महिला व बालविकास अधिकारी दरपलवार, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेसिंग चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंके यांच्यासह विविध जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विभाग प्रमुख उपस्थित होते.

******