उद्योग मंत्री उदय सामंत यांची कौशल्य विकास केंद्रास भेट

अमरावती, दि. 13 (जिमाका) : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नांदगाव पेठ येथील एमआडीसीच्या कौशल्य विकास केंद्रास आज भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रामधील यंत्रसामुग्री आणि प्रशिक्षण व्यवस्थेची पाहणी केली.

स्थानिक उद्योजकांच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी नांदगाव पेठे येथील एमआयडीसी परिसरातील उद्योगांच्या अनुषंगाने युवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. अत्याधुनिक लॅब असल्याने प्रशिक्षणार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळण्यास मदत होत आहे. प्रशिक्षणासोबतच प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येत आहे. याठिकाणी स्थानिक उद्योजकांनी 440 प्रशिक्षित कामगारांची मागणी नोंदविली आहे, अशी माहिती देण्यात आली.

मंत्री श्री. सामंत यांनी, इमारतीचे बांधकाम उत्कृष्ट झाले आहे. याठिकाणी अत्याधुनिक मशिनही देण्यात आले आहे. त्यामुळे या कौशल्य विकास केंद्राचे मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. येत्या 15 दिवसांच्या कालावधीत उद्घाटनाची तयारी करावी. या कार्यक्रमासाठी आयटीआय, तंत्रनिकेतन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बोलाविण्यात यावे. उद्घाटन कार्यक्रमात ‘माझी मराठी, अभिजात मराठी’ हा एक तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. तसेच यानिमित्ताने मुंबई, सुरत, अहमदाबाद येथील टेक्सटाईल क्षेत्रातील उद्योजकांशीही चर्चा ठेवण्यात यावी, अशी सूचना केली.

मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केंद्रामधील सर्व यंत्रसामुग्री, प्रशिक्षण कक्षाची पाहणी केली. इमारतीमध्ये स्वच्छता राखण्यासोबतच इमारतीच्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

00000