ग्रंथालय कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजनेचा लाभ देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १३ : राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना (ESIS) लागू करण्यासाठी नोंदणीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.

आज मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ही योजना लागू झाल्यानंतर राज्यातील जवळपास २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा होईल. यासाठीचा सविस्तर प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवून यामधील तांत्रिक बाबींची तपासणी राज्य कामगार विमा योजनेतील  ग्रंथालय कर्मचाऱ्यांना कसा लाभ मिळवता येईल  या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.

तसेच, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालयाला राजाराम महाविद्यालयात इमारतीसाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठीही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/