अवयवदान प्रबोधन चळवळ निरंतर सुरू ठेवू, अवयवदानाचे महत्त्व घराघरात पोहोचवूया. – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. 13 : “अवयवदान  प्रबोधन चळवळ  निरंतर सुरू ठेवू, मरणोत्तर अवयवदानाचे महत्त्व घराघरात पोहोचवू आणि पुढील वर्षीच्या अवयवदान पंधरवड्यात उत्कृष्ट कार्यासाठी एकमेकांचे अभिनंदन करण्याची संधी निर्माण करू,”  असे आवाहन  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन आणि झेडटीसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान पंधरवड्यानिमित्त राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य  विभागाचे उपसंचालक तसेच इतर खासगी रुग्णालयाच्या प्रमुखांचे प्रशिक्षण कार्यक्रम सायन मुंबई येथे आयोजित केला होता.

राज्यात 3 ते 15 ऑगस्टदरम्यान अवयवदान पंधरवडा साजरा केला जात आहे. या कालावधीत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, विविध सेवाभावी संस्था व खासगी रुग्णालये अवयवदान मोहिमेचा प्रचार-प्रसार करत आहेत. लोकांनी अंधश्रद्धा व अनावश्यक भीती न बाळगता मरणोत्तर अवयवदानासाठी पुढे यावे व ही चळवळ गतिमान करावी, असे मंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

सध्या अवयव प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने जनप्रबोधनाची गती अधिक वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी राज्यभर सर्व पालकमंत्र्यांच्या हस्ते अवयव दात्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार आहे. या उपक्रमाला सर्व माध्यमांतून प्रसिद्धी मिळावी, जेणेकरून अवयवदात्यांच्या योगदनाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचेल, ही प्रबोधन चळवळ निरंतर सुरू ठेवू, आपल्या सर्वांच्या कामाचे सातत्याने मूल्यमापन करू आणि पुढील वर्षीच्या पंधरवड्यात उत्कृष्ट कार्यासाठी एकमेकांचे अभिनंदन करण्याची संधी निर्माण करू, असा संकल्पही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रशिक्षण कार्यक्रमास आरोग्य विभागाचे डॉ. नितीन अंबाडेकर, झेडटीसीसीचे प्रेसिडेंट डॉ. सुरेंद्रकुमार माथुर, आरओटीटीओ-एसओटीटीओ (ROTTO-SOTTO) चे प्रेसिडेंट डॉ. आकाश शुक्ला, वैद्यकीय शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मोहिते, उपसंचालक डॉ. अशोक नांदापूर यांच्यासह अवयवदान क्षेत्रात कार्यरत सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांचे प्रमुख डॉक्टर उपस्थित होते. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपसंचालक यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला.

000

संजय ओरके/विसंअ/