देशांतर्गत बाजारातही मत्स्य विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

अमेरिकेने टेरिफ वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर मत्स्योत्पादनांसाठी नवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे

VIRENDRA DHURI

मुंबई, दि. 13 : अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर मोठ्या प्रमाणावर टेरिफ वाढवले आहे. त्यामुळे भारतीय उत्पादने अमेरिकेत महाग होऊन त्याची मागणी घटण्याची शक्यता आहे. देशातून मोठ्या प्रमाणावर मत्स्योत्पादन अमेरिकेत निर्यात केले जाते. या टेरिफ वाढीच्या पार्श्वभूमीवर मत्स्योत्पादनासाठी नवनवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे. तसेच देशांतर्गत बाजारातही मत्स्यविक्री आणि मत्स्य पुरवठा वाढण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

अमेरिकेने केलेल्या टेरीफ वाढीचा मत्स्योद्योग, आंबा आणि काजू निर्यातीवर होणाऱ्या परिणांमाविषयी आढावा घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मंत्री राणे यांनी सूचना दिल्या. या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टेरीफ वाढीमुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करून सागरी उत्पादन विकास प्राधिकरणाची बैठक आयोजित करावी असे सूचित करुन मंत्री राणे म्हणाले की, इतर देशातील बाजारांचा विचार करत असतानाच देशांतर्गत बाजारातही जास्तीत जास्त मासळी विशेषतः कोळंबी विक्रीसाठी कशी आणता येईल. यासाठी शासनस्तरावरून कशा स्वरुपे योजना आणता येईल. तसेच निर्यातदारांना कशा प्रकारे मदत करता येईल याचा प्रारुप आराखडा सादर करण्यात यावा. तसेच देशांतर्गत बाजारपेठेत मासळी पुरवठा वाढवण्याविषयी या व्यवसायातील खासगी संस्थांशी बैठक आयोजित करावी. आंबा निर्यातीसोबतच देशातील महत्वाच्या शहरांमध्ये जसे दिल्ली, बेंगलोर, ग्वाल्हेर, जबलपूर येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करून आंब्याची देशांतर्गत मागणी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मंत्री राणे यांनी यावेळी दिल्या.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/