मुंबई, दि. १३ : भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण समारंभाची सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागाने जय्यत तयारी केली आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.०५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा होणार आहे. यानिमित्त आज राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव सुनील सोनार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन रंगीत तालीम पार पडली.
यावेळी पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे, मुख्यमंत्री सुरक्षाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद कुरडे, श्रीनिवास घाडगे यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
श्री. सोनार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजाला सलामी देण्यात आली. संचलनात मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, मध्यप्रदेश पोलीस दल आणि घोडेस्वार सामील झाले होते.
स्वातंत्र्यदिनाला यांची असणार उपस्थिती
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, लोकायुक्त, मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुख्य निवडणूक आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त, महावाणिज्य दूतावासातील अधिकारी, सेवा हक्कचे मुख्य आयुक्त, मॅटचे अध्यक्ष, एमपीएससीचे अध्यक्ष, महिला हक्क आयोगाच्या अध्यक्ष, मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, भारतीय सेना, नौसेना, वायुसेना, भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
000000
श्री.धोंडिराम अर्जुन/स.सं./