- महाराष्ट्रात १९ हजार २०० कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा
- महाराष्ट्रात डेटा सेंटर आणि औद्योगिक पार्कसाठी मोठी गुंतवणूक; रोजगाराच्या थेट ६० हजार संधी उपलब्ध होणार
ठाणे,दि.१२ (जिमाका): ‘मेडिसिटी’ हा एक महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प असून या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नागपूरला देशातील एक प्रमुख वैद्यकीय केंद्र बनविणे, तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून केवळ विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि शेजारील राज्यांतील रुग्णांनाही उत्तम उपचार मिळावेत, हा आहे. या मेडिसिटीमध्ये विविध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, रिसर्च सेंटर्स, वैद्यकीय शिक्षण संस्था आणि इतर आरोग्य सुविधांचा समावेश असणार आहे. या मेडिसिटीच्या निर्माणासाठी मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस प्रा. लि. आणि टेमासेक यांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबईतील ऐरोली येथे केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई येथे कॅपिटालँड डेटा सेंटरचे उद्घाटन पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सिंगापूरचे परिवहन मंत्री जेफरी सिओ, कॅपिटालँड इंडिया ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर खैतानी, कॅपिटालँड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव दासगुप्ता, मुख्यमंत्र्यांचे मुख्य गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र शासन आणि मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस प्रा. लि. आणि टेमासेक यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत नागपूर येथे 350 खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार असून, यासाठी रु.700 कोटींपर्यंतची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे अंदाजे रोजगाराच्या 3 हजार संधी देखील उपलब्ध होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी संबंधित कंपनीला आवाहन केले आहे की, त्यांनी नागपूरमध्ये मेडिसिटी उभारावी. नागपूरमधील मेडिसिटी हा एक महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प असून या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नागपूरला देशातील एक प्रमुख वैद्यकीय केंद्र बनविणे, नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून, केवळ विदर्भातीलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि शेजारील राज्यांतील रुग्णांनाही उत्तम उपचार मिळावेत, हा आहे. या मेडिसिटीमध्ये विविध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, रिसर्च सेंटर्स, वैद्यकीय शिक्षण संस्था आणि इतर आरोग्य सुविधांचा समावेश असणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘स्टेट ऑफ आर्ट’ अशा प्रकारच्या कॅपिटालँडच्या डेटा सेंटरचे आज उद्घाटन संपन्न झाले आहे. ‘टेक्नॉलॉजी व्हाईस ॲडवान्स’ अशा प्रकारचे हे डेटा सेंटर असून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अतिशय चांगल्या पद्धतीच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. आपण ज्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची कार्यक्षमता वाढविण्याकरिता आपल्याला डेटा सेंटरची आवश्यकता पडते आणि म्हणून देशामध्ये देखील ही क्षमता उभी राहणे महत्त्वाचे आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, देशाची 60 टक्के डेटा सेंटर क्षमता एकट्या महाराष्ट्रात उभी राहिली आहे. आज महाराष्ट्र शासन आणि कॅपिटालँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत सुमारे रु.19 हजार 200 कोटींची प्रस्तावित गुंतवणूक होणार असून, कॅपिटालँड इन्व्हेस्टमेंट आणि महाराष्ट्रातील त्यांच्या सहयोगी कंपन्यांकडून या गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. तसेच या करारामुळे अंदाजे रोजगाराच्या थेट 60 हजार संधी देखील उपलब्ध होणार आहेत. या करारांतर्गत मुंबई आणि पुणे येथे बिझनेस पार्क्स, मुंबई आणि पुणे येथे डाटा सेंटर्स, संपूर्ण महाराष्ट्रात लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक पार्क्स हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
त्यासोबतच मेपल ट्री सोबत 3 हजार कोटींचा करार केला असून त्या माध्यमातून ते आपल्याकडे काही लॉजिस्टिक पार्क्स तयार करणार आहेत. आज अतिशय महत्त्वाचे करार झालेले आहेत आणि हे डेटा सेंटर जे अतिशय विक्रमी वेळामध्ये त्यांनी पूर्ण केले आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस शेवटी म्हणाले.
यावेळी सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग म्हणाले की, आज नवी मुंबईमध्ये कॅपिटालँड डेटा सेंटर यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी येथे उपस्थित राहून मला खूप आनंद होत आहे. नवी मुंबई हे भारतातील एक महत्त्वाचे डिजिटल केंद्र बनत आहे, आणि मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळूरू यांसारख्या शहरांसोबत हे केंद्र भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करीत आहे.
भारतात सध्या 800 दशलक्षाहून अधिक इंटरनेट वापरकर्ते आणि मजबूत स्टार्टअप इकोसिस्टम आहे. त्यामुळे, डेटा सेंटरची मागणी पुढील काळात झपाट्याने वाढण्याची अपेक्षा आहे. भारतातील डेटा सेंटरची क्षमता सध्याच्या 1.2 गिगा वॅटवरून 2030 पर्यंत 4.5 गिगा वॅटपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
हे डेटा सेंटर कॅपिटालँडच्या भारतातील गुंतवणुकीचा एक भाग असून आम्हाला आनंद आहे की, कॅपिटालँडने महाराष्ट्र सरकारसोबत विविध प्रकल्पांमध्ये, जसे की बिझनेस पार्क्स, लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रियल पार्क्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक करार केला आहे. यामुळे कॅपिटालँड पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात 2 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा (सुमारे 16 हजार 600 कोटी रुपये) जास्त गुंतवणूक करेल.
हे गुंतवणुकीचे करार सिंगापूर आणि भारत यांच्यातील मजबूत आर्थिक संबंध दर्शवित आहेत. तसेच, भारत हे जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असल्यामुळे सिंगापूरच्या कंपन्यांसाठीही येथे अनेक संधी निर्माण होत आहेत. उदाहरणार्थ, ‘इंडिया-सिंगापूर डिजिटल अर्थव्यवस्थे’च्या करारानुसार, दोन्ही देशांच्या कंपन्यांमध्ये डिजिटल पेमेंट आणि फिनटेक क्षेत्रांत सहकार्य वाढविले जात आहे. या संधींमुळे सिंगापूर आणि भारत यांच्यातील संबंध अधिक मजबूत होत आहेत. या नवीन डेटा सेंटरच्या माध्यमातून उद्योगांना, स्टार्टअप्सना आणि उद्योजकांना डिजिटल युगात नवीन संधी शोधण्यासाठी मदत करेल आणि भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी योगदान देईल, असेही ते शेवटी म्हणाले.
याप्रसंगी कॅपिटालँड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव दासगुप्ता म्हणाले की, भारत कॅपिटालँडसाठी एक प्रमुख बाजारपेठ आहे आणि महाराष्ट्र, त्याच्या मजबूत आर्थिक मूलभूत गोष्टी आणि सुविकसित आयटी आणि औद्योगिक संस्थांसह, आमच्यासाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देत आहे. आम्ही महाराष्ट्राच्या व्यावसायिक आणि औद्योगिक विकासात आणखी योगदान देण्यास सदैव तयार आहोत.
०००