मुंबई, दि. १२ : राज्यात मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन होते. जानेवारी आणि फेब्रुवारी वगळता मुंबई हे फुलांचे सर्वात मोठे खरेदी विक्री केंद्र आहे. वर्षभर या ठिकाणी फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात होते. फुले शेतमाल नियमनाखाली नसल्याने आणि सर्व सुविधायुक्त स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. बृहन्मुंबईत फुलांची स्वतंत्र बाजारपेठ सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने कार्यवाही करुन दादर, गोरेगाव अथवा नवी मुंबई येथे अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त फुल बाजारासाठी जागा शोधून ती उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीच्या ठिकाणी शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांच्या सोयीच्या ठिकाणी एक अत्याधुनिक आणि सोयी सुविधांनी युक्त अशी बाजारपेठ असावी या मागणीसाठी दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी मंत्री रावल यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत आमदार मनिषा चौधरी, पणन विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री रावल म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात फुलांची शेती केली जाते. मुंबईत फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. फुल निर्यातीच्याही संधी आहेत. मात्र, फुलांची सर्व सुविधायुक्त बाजारपेठ असणे आवश्यक आहे. दादर येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल बाजारपेठेची अस्तित्वातील जागा लहान असल्याने तिचा पुनर्विकास होणार असल्यास महानगरपालिकेमार्फत तेथे आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. ही जागा अपुरी असल्यास गोरेगाव येथे उपलब्ध असलेल्या जागेत अथवा नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. परळ येथील कामगार मैदान येथे सकाळी ५ ते ९ या वेळेत जागा उपलब्ध होऊ शकेल का, या पर्यायांचाही विचार करण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सुचविले.
मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. पॉलिहाऊस आणि शेडनेटमध्ये दर्जेदार फुलांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून बृहन्मुंबईमध्ये अत्याधुनिक कट फ्लॉवर्स बाजार असणे गरजेचे आहे, अशी मागणी असोसिएशनच्या वतीने यावेळी करण्यात आली.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/