लातूर, दि. ११ (जिमाका): लोकनेते माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
लातूर जिल्हा परिषदेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम प्रसंगी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सर्वश्री विक्रम काळे, रमेश कराड, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर महापालिका आयुक्त मानसी मीना आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी कार्यक्रमस्थळी भारतीय संविधानाची प्रत देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यानंतर पुतळयाच्या नामफलकाचेही अनावरण केले.
जिल्हा परिषदेच्या परिसरातील माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याची उंची १४ फूट असून कांस्य धातुमध्ये हा पुतळा बनविला आहे. त्याचे वजन ९०० किलो आहे. ३४५१.५६ चौ.मी.जागेत हा पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचे काम वास्तु विशारद विनय इंगळे यांनी काम पाहिले तर शिल्पकार विजय बोंदर व अंबादास पायघन यांनी पुतळा तयार केला. पुतळा उभारणी व सुशोभीकरणास १ कोटी ५१ लक्ष रुपये खर्च करण्यात आले. पुतळा अनावरण कार्यक्रम प्रसंगी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
०००