बुलढाणा, (जिमाका) दि. ९ : चिखली तालुक्यातील देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पतसंस्थेचे उद्घाटन आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष तथा आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार विजयराव शिंदे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, माजी आमदार तोताराम कायदें तसेच जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसिलदार संतोष काकडे आदी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर बावनकुळे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली. महिलांना आर्थिक सबलीकरणासाठी अशा संस्थांची गरज अधोरेखित केली. महिलांना आर्थिक व्यवहारात सक्षम बनविण्यासाठी पतसंस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. देवाभाऊ लाडकी बहिण पतसंस्थामुळे स्वयंरोजगार व बचत संस्कृती बळकट करण्यास मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला. या पतसंस्थेच्या राज्यभर शाखा उभारून लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या साक्षर व सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, ‘शासन गोरगरीब, शेतकरी व सामान्य नागरिकांसाठी काम करत आहे. लाडक्या बहिणींना दरमहा १,५०० रुपये दिले जात आहेत, शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जात आहे, लवकरच समितीचे सर्व्हेक्षण पूर्ण करून गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. स्वस्तात शेतजमीन मोजणी, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे अल्पदरात उपलब्ध करणे, नकाशा योजनेद्वारे प्रॉपर्टी कार्ड, स्वामित्व योजना, पाणंद रस्ता, तुकडेबंदी कायदा रद्द करणे असे ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतले आहेत.’
चिखली तालुक्यातील जिवंत सातबारा मोहिम संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी असल्याने ती राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले, चिखली तालुका हा पतसंस्थांचा माहेरघर आहे. देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेमुळे महिलांना बचत ठेवण्याचे हक्काचे ठिकाण मिळाले आहे. केवळ अल्पावधीत २,५०० बहिणींनी येथे खाते उघडून हे सिद्ध केले आहे. या पतसंस्थेमार्फत महिलांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार असून महिलांनी स्वयंरोजगारासाठी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार श्वेता महाले यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या भावी योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्था ही महाराष्ट्रातील पहिली महिलांची नागरी पतसंस्था असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा नवा टप्पा ठरेल. या उपक्रमाचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना स्वावलंबी बनवणे आणि लोकसंख्येतील सुमारे ४० टक्के हिस्सा असलेल्या महिलांना उद्योग, व्यवसाय व आर्थिक व्यवहारात प्रोत्साहन देणे हा आहे.
उद्घाटन सोहळ्यासाठी स्थानिक मान्यवर, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, तसेच विविध महिला बचतगटांच्या प्रतिनिधीं, मोठ्या संख्येने नागरिक, महिला सदस्य आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
00000