मुंबई, दि. ७ : ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपूर्ण आणि उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या विशेष विक्री प्रदर्शनास ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी भेट दिली.
या प्रदर्शनात महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे निरीक्षण करत, मंत्री श्री. गोरे यांनी महिलांशी संवाद साधून त्यांना प्रेरणा दिली.
ग्रामीण महिलांना मुंबईत व्यासपीठ
राष्ट्रीय हातमाग दिन आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रदर्शनात पालघर, पनवेल, कर्जत, पेण आणि जळगाव जिल्ह्यांतील एकूण 10 महिला बचत गटांनी सहभाग घेतला. या गटांनी तयार केलेल्या वस्तूंमध्ये आकर्षक राख्या, पौष्टिक लाडू, पारंपरिक तोरण, हस्तनिर्मित दागिने, जाम, जेली आणि ज्यूस यांचा समावेश आहे. तसेच, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत भारतीय राष्ट्रध्वज “तिरंगा” देखील विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.
मंत्र्यांकडून महिलांना मार्गदर्शन आणि आश्वासन
प्रत्येक स्टॉलला भेट देत मंत्री श्री. गोरे यांनी उत्पादनांची माहिती घेतली आणि महिलांना विक्री व ब्रँडिंगसंबंधी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, या उपक्रमांद्वारे ग्रामीण महिलांना आर्थिक संधी उपलब्ध होत असून, शासनाची भविष्यातही अशीच साथ राहणार आहे.
या भेटीदरम्यान ‘उमेद’च्या लाडक्या बहिणींनी मंत्री श्री.गोरे यांना राखी बांधली.या वेळी उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, अवर सचिव धनवंत माळी, तसेच इतर मान्यवर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
००००
किरण वाघ/विसंअ