धरती आबा योजनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विकासाला चालना – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास मंत्र्यांनी विद्यार्थिनी आणि लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला

पालघर, दि. ७ ऑगस्ट : ‘प्रधानमंत्री जनजातीय न्याय महाअभियान आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ या योजनेसह विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला दिशा देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात आज प्रशासन, वस्तीगृहातल्या विद्यार्थिनी व लाभार्थ्यांशी आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांनी थेट संवाद साधला.
जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार विनोद निकोले, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी.  (दूरदृश्य प्रणालीद्वारे ) जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे गोपीचंद कदम,  अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,  प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, जव्हार सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


आदिवासी समाजासाठी विशेष संकल्प
या वेळी बोलताना  आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ.अशोक वुईके यांनी सांगितले की, “आदिवासी समाजासाठी 1972 पासून स्वतंत्र विभागाची स्थापना झाली.  समाजकल्याण व आदिवासी विकास विभाग वेगळे करण्यात आले. त्यानंतर स्वतंत्र बजेट आणि योजना देण्यात आल्या.  अजूनही शासकीय आश्रमशाळांच्या गुणवत्तेबाबत सकारात्मक सुधारणा करण्यात येणार आहेत. शासकीय आश्रमशाळा हे केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण, व्यक्तिमत्त्व विकास आणि स्पर्धात्मक क्षमतेचा विकास हे आमचे मुख्य उद्दिष्ट आणि संकल्प असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.अशोक वुईके यांनी केले.

राघोजी भांगरे शिष्यवृत्ती योजना – विद्यार्थी विकासाचा नवा अध्याय
‘क्रांतिवीर राघोजी भांगरे शिष्यवृत्ती योजने’ अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन सन्मान करण्यात येणार असून . “जेव्हा समाजात विद्यार्थी आणि त्यांचे पालक गौरवले जातात, तेव्हा त्यांच्या मनात नवचैतन्य आणि प्रेरणा निर्माण होते. त्यामुळे अशा योजनेचा प्रभावी प्रचार-प्रसार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन श्री. वुईके,” यांनी सांगितले .

धरती आबा योजना ही आदिवासी समाजा साठी सर्वांगीण विकासाची संधी
कुटुंबांच्या शेतीसंबंधी गरजा, पाणी, सिंचन, बियाणे, खत, साधने , रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार यासह पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.यासाठी हि योजना थेट मदत करणारी योजना आहे. या योजनेचा लाभ अनुसूचित जमातींच्या सर्व घटनांना मिळणार आहे

जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी केलेल्या जिल्ह्यातील अंमलबजावणीचे कौतुक

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांचे काम व कार्यपद्धतीचे विशेष कौतुक आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांनी केले, “२०१९ मध्ये डॉ.इंदु राणी जाखड गडचिरोली मध्ये प्रकल्प अधिकारी होत्या  तिथेही त्यांनी अनेक उपक्रम प्रभावीपणे राबवले होते. आता त्या पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असल्यामुळे शासकीय योजना पासून एकही कुटुंब वंचित राहणार नाही असा विश्वासही आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांनी व्यक्त केला.
पालघर जिल्ह्याच्या आदिवासी समाजातील विकासासाठी शासन, प्रशासन आणि समाज यांच्यातील सुसंवाद साधने आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड शासनाच्या योजनेचा लाभ देतील .पालघर जिल्ह्यातील ६५४ गावांतील 1 लाख 81 हजार 552 कुटुंबीयांपर्यंत धरती आबासह विविध लोक उपयोगी योजना पोहोचवण्याचे उद्दिष्ट पालघर जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे.असेही प्रा. डॉ. वुईके यांनी सांगितले

पालघर येथील शासकीय मुलीच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीशी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ.अशोक वुईके यांनी साधला संवाद

पालघर शहरातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय मुलीच्या वसतिगृहाची पाहणी करून विद्यार्थिनीच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी मंत्री प्रा .डॉ. अशोक वुईके यांनी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अन्न तसेच राहण्याची व्यवस्था योग्य प्रकारे आहे याची खात्री केली.
धरती आबासह विविध योजनेचा आढावा आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ.अशोक वुईके यांनी घेतला . यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच लाभार्थ्यांना धनादेशाची वाटप आणि 9 ऑटो रिक्षाचे वितरण आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते करण्यात आले.

००००