अवयवदान सर्वश्रेष्ठ दान…

अवयवदान हे एक महान दान आहे, ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. मात्र, समाजामध्ये अवयव दानाविषयी अनेक गैरसमज आणि भीती आहेत, ज्यामुळे अवयव दानाचे प्रमाण खूप कमी आहे. यावर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘अंगदान जीवन संजीवनी अभियान’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. याविषयी आणि अवयव दानाचे महत्व विशद करणारा हा लेख…

जगातील पहिले मानवी अवयव प्रत्यारोपण १९५४ मध्ये झाले, तर भारतात १९७१ मध्ये सीएमसी वेल्लोर येथे करण्यात आले. दुर्दैवाने ७५ वर्षांनंतरही भारतात अवयवदानाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. आज आपल्याकडे जे काही अवयव प्रत्यारोपण होत आहे, त्यात बहुसंख्य थेट संबंधित दात्यांकडून आहेत, तर ब्रेनडेड रुग्णांचे कॅडेव्हरिक अवयवदान नेहमीच मागे राहिले आहे. या उदात्त आणि मानवी कारणासाठी पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात दहा हजारांपैकी केवळ एक रुग्ण अवयवदानासाठी संमती देतो, तर पाश्चिमात्य देशांत १० हजार लोकसंख्येपैकी सुमारे ३५०० लोकांमध्ये अवयवदानासाठी संमती मिळते.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्थेच्या (NOTTO) आकडेवारीनुसार भारतात एकूण अवयव प्रत्यारोपणाची संख्या १८,९०० आहे. तसेच मृत दात्यांची संख्या १,१२८ तर जिवंत दात्यांची संख्या १५,००० आहे. मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीतील रुग्णांची संख्या आणि भारतातील अवयवदान दर प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे एक टक्क्यापेक्षा कमी असल्याची स्थिती आहे.

वर्ष २०२४ च्या अखेरपर्यंत भारतात शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंड आणि यकृताच्या आजारांच्या उपचारांसाठी २ लाख मूत्रपिंड आणि १ लाख यकृताची गरज आहे. मात्र दरवर्षी केवळ ४००० मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि ५०० यकृत प्रत्यारोपण केले जात असून, हजारो रुग्ण नवीन आयुष्य जगण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत अवयवांअभावी मृत्युमुखी पडत आहेत. हृदयाची परिस्थिती आणखी बिकट असून, पाच हजार रुग्णांना हृदयाची गरज असून केवळ 253 हृदय प्रत्यारोपण केले जात आहे. तसेच २२० फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे.

सध्या भारतात सुमारे ५७० अवयव प्रत्यारोपण केंद्रे असून केवळ १४० नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर्स आहेत, जे लोकसंख्येच्या सध्याच्या गरजेनुसार खूपच कमी आहेत. दुसरे म्हणजे यातील बहुसंख्य खाजगी संस्था आहेत, जिथे उपचारांचा खर्च सर्वांना परवडणारा नाही. यावर उपाय म्हणून कमी खर्चाचे परवडणारे प्रत्यारोपण केंद्रांची संख्या वाढविणे आवश्यक आहे.

रस्ते अपघातात दरवर्षी सुमारे दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात, त्यापैकी अनेक जण उपचारादरम्यान ब्रेनडेड होतात. एक ब्रेनडेड रुग्ण २ मूत्रपिंड, १ यकृत, १ हृदय, २ फुफ्फुस, १ स्वादुपिंड यांचा संभाव्य दाता असून एकाच वेळी ७ जीव वाचवू शकतो. तसेच कॉर्निया, त्वचा, हाडे यासारख्या ऊतींचे दान करू शकतो आणि अपंग रुग्णांना विविध अपंगत्वापासून मुक्त होण्यास मदत करू शकतो.

राज्यातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी दि. ३ ऑगस्ट १५ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रमांनी अवयवदान पंधरवडा साजरा होत आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वत: पुढाकार घेत अर्ज भरून अवयवादानाची शपथ घेतली आणि या अभियानाचा शुभारंभ केला. राज्यातील जनतेने या अभियानामध्ये सहभागी होऊन अवयवदानाची शपथ घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री आबिटकर यांनी केले आहे.

अवयवदान ही एक सामाजिक बांधिलकी आहे. समाजामध्ये या विषयाबाबत सकारात्मक मतपरिवर्तन घडवण्यासाठी प्रभावी जनजागृती अत्यावश्यक आहे. मोहिमेतून अवयवदानासंबंधी भीती, गैरसमज व अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. यासाठी ‘अंगदान जीवनदान संजीवनी अभियान’  दि. ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यात राबविण्यात येत आहे. या कालावधीत व्यापक जनजागृती व समाजाभिमूख उपक्रम राबविले जात असून यात शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, आरोग्य संस्था व सामाजिक कार्यकर्ते आदींचा सक्रिय सहभाग आहे. यावर्षीच्या मोहिमेचे घोषवाक्य “देहदान, महादान, दुसऱ्याला जीवनदान” असे आहे.

या मोहिमेंतर्गत अवयवदानाच्या महत्त्वाविषयी जनजागृती करणे, अवयवदानाच्या गैरसमजांवर प्रकाश टाकणे, लोकांना अवयवदान करण्यास प्रोत्साहित करणे, अवयवदात्यांचा सन्मान करणे, गरजू रुग्णांना नवीन जीवनदान देण्यासाठी प्रेरित करण्यासाठी गावे, वाड्या, वस्त्या या ठिकाणी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत घरोघरी जाऊन मोहिमेची माहिती देऊन अवयव दानाबाबत प्रोत्साहन दिले जाणार आहे.

अवयवदान म्हणजे काय ? :

अवयवदान म्हणजे अशी प्रक्रिया जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा अवयव काढून दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यारोपित करण्यास कायदेशीररित्या परवानगी देते. एकतर दाता जिवंत असताना संमतीने, मृत्यूपूर्वी केलेल्या मृत देणगीसाठी कायदेशीर परवानगीद्वारे किंवा कायदेशीर जवळच्या नातेवाईकाच्या परवानगीद्वारे मृत देणगीसाठी परवानगी दिली जाते. देणगी संशोधनासाठी असू शकते किंवा सामान्यतः, निरोगी प्रत्यारोपण करण्यायोग्य अवयव आणि ऊती दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित करण्यासाठी दान केली जाऊ शकतात.

प्रत्यारोपणामध्ये मूत्रपिंड, हृदय, यकृत, स्वादुपिंड, आतडे, फुफ्फुसे, हाडे, अस्थिमज्जा, त्वचा आणि कॉर्निया यांचा समावेश होतो. काही अवयव आणि ऊती जिवंत दात्यांद्वारे दान केल्या जाऊ शकतात, जसे की मूत्रपिंड किंवा यकृताचा काही भाग, स्वादुपिंडाचा काही भाग, फुफ्फुसांचा काही भाग किंवा आतड्यांचा काही भाग, परंतु बहुतेक देणग्या दात्याच्या मृत्यूनंतर होतात.

अवयवदान अनेक लोकांचे जीव वाचवू शकते. एका व्यक्तीच्या अवयवदानाने अनेक गरजू लोकांना नवीन जीवन मिळू शकते. अवयवदान करणे म्हणजे एक सामाजिक कार्य आहे. यामुळे समाजाला मदत होते आणि गरजू लोकांना आरोग्यदायी जीवन जगण्याची संधी मिळते. अवयवदानामुळे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात पुनर्जन्म मिळतो, असे मानले जाते. अवयव निकामी झालेल्या किंवा गंभीर वैद्यकीय परिस्थितीत असलेल्या लोकांना अवयवदानामुळे जीवनात दुसरी संधी मिळते.

अवयवदानाबद्दल गैरसमज : काही लोकांना अवयवदानाच्या बाबतीत धार्मिक गैरसमज आहेत. मात्र, अनेक धर्म अवयवदानाचे समर्थन करतात. काही लोकांना असा गैरसमज आहे की अवयवदानामुळे मृत्यूनंतर अंत्यसंस्कारांना उशीर होतो. मात्र, अवयवदान प्रक्रिया कमी वेळेत पूर्ण केली जाते. काही लोकांना वैद्यकीय गैरसमज आहेत की, अवयवदान केल्यास त्यांचे शरीर पूर्णपणे निकामी होईल. परंतु, अवयवदान करताना, डॉक्टरांकडून आवश्यक ती काळजी घेतली जाते.

अवयवदान कसे करावे : अवयवदान करण्यासाठी, तुम्ही राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेच्या (NOTTO) (National Organ & Tissue Transplant Organization) संकेतस्थळावर किंवा इतर मान्यताप्राप्त अवयवदान संस्थांमध्ये नोंदणी करू शकता. अवयवदान करण्यापूर्वी, आपल्या कुटुंबातील सदस्यांशी याबद्दल चर्चा करणे महत्वाचे आहे. त्यांना आपल्या निर्णयाबद्दल माहिती देणे आणि त्यांची संमती घेणे आवश्यक आहे. अंगदान जीवनदान संजीवनी अभियान दि.३ ते १५ ऑगस्टपर्यंत चालणार असून, या कालावधीत सर्व आरोग्य संस्थेमध्ये, गाव, वाडी, वस्ती इत्यादी ठिकाणी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत घरोघरी जाऊन मोहिमेची माहिती देऊन अवयव दानाबाबत प्रोत्साहन दिले जाणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरीकानी सहभागी होउन मोलाचे दान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सुनील देशपांडे यांची अवयवदान प्रतिज्ञा राज्य शासनाने अधिकृतपणे अवयवदान प्रतिज्ञा म्हणून घोषित केलेली आहे.

‘अवयवदान प्रतिज्ञा’

‘माणुसकी हा माझा मूळ धर्म आहे. पीडीतांच्या व गरजूंच्या जीवनात आनंद फुलवणे हीच माणुसकीची खरी शिकवण आहे, अशी माझी श्रद्धा आहे.

अवयवदानामुळे गरजू रुग्णांच्या जीवनात आनंद फुलविणे शक्य आहे तसेच मृत्यूपंथाला लागलेल्या व्यक्तीला नवा जन्म देता येतो. त्यामुळे हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे यावर माझा विश्वास आहे.

मी प्रतिज्ञा करीत आहे की, माझ्या शरीरात जे जे अवयव दुसऱ्या मानवाच्या जीवनात आनंद फुलवू शकतील अशा अवयवांवर माणुसकीचा पहिला हक्क व अधिकार असेल.

माझ्या अवयवांचा अशा माणुसकीच्या पुण्यकार्यासाठी उपयोग झाला पाहिजे, असा माझा आग्रह आहे.

माझ्या पुढील पिढ्यांनी या आग्रहाचा मान राखावा म्हणून मी त्यांना सतत स्मरण देत राहीन आणि पुढील पिढ्यांवर असेच संस्कार व्हावेत यासाठी मी प्रयत्नशील राहीन.’

महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि त्याचा अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून ‘अंगदान जीवन संजीवनी अभियान’ नक्कीच मदतीचे ठरेल. यातून प्रत्येक महाराष्ट्रीय नागरिकाला अवयवदानाच्या कार्यपद्धतीची चांगली माहिती होईल आणि त्यांचे सर्व गैरसमज समाधानकारक आणि वैज्ञानिकदृष्ट्या दूर होतील, अशी अपेक्षा आहे.

००००

  • विजय राऊत (मो.न.9975412820)

सहायक संचालक (माहिती)

विभागीय माहिती कार्यालय, अमरावती