अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणात सहभाग वाढविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. ७ :अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील सहभाग वाढवण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले.

अल्पसंख्याक व औकाफ विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, आयुक्त प्रतिभा इंगळे, उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्यासह विभागीय अधिकारी उपस्थित होते.

अल्पसंख्याक विकास मंत्री कोकाटे म्हणाले की, अल्पसंख्याक विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये आणि जास्तीत जास्त विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत पोहोचावेत यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, कौशल्य विकास व पायाभूत सुविधा योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी.

यावेळी विभागाच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. सध्या राज्यात २६ ठिकाणी मुलींसाठी वसतीगृहे कार्यरत असून तीन ठिकाणी बांधकाम प्रगतीपथावर आहे. नव्याने एका वसतीगृहास मान्यता देण्यात आली आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व वाढवण्यासाठी मराठी फाउंडेशन वर्गही सुरू करण्यात आले आहेत.

स्पर्धा परीक्षांसाठी मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या केंद्रांमध्ये प्रत्येकी १० अनिवासी महिला उमेदवारांना दरमहा चार हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जात आहे. तसेच वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आहारभत्ता दिला जातो.

छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातील १५ जिल्ह्यांमध्ये एकूण २८०० महिला बचतगट तयार केले जाणार असून, या महिलांना कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५० उमेदवारांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण खासगी संस्थेमार्फत देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

राज्य अल्पसंख्याक आयोग, राज्य उर्दू अकादमी, राज्य हज समिती, राज्य वक्फ बोर्ड, जैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, राज्य पंजाबी साहित्य अकादमी यांच्या कार्याचा आढावाही यावेळी घेण्यात आली. योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री कोकाटे यांनी यावेळी दिले.

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ