परभणी, दि. ३ (जिमाका) – शेतकरी, घरगुती ग्राहक आणि नवउद्योजकांना २४ तास व योग्य दाबाने वीज मिळावी यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. तसेच विविध योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा वापरण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे तरी शेतकरी व नागरिकांनी विविध सौर ऊर्जा योजनेचा लाभ अवश्य घ्यावा, असे आवाहन ऊर्जा राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टप्पा २.० योजने मधून क्षमता बळकटीकरण अंतर्गत व सुधारित वितरण क्षेत्र योजना अंतर्गत महावितरणच्या ३३/११ किलोवॅट पेडगाव उपकेंद्रामध्ये नव्याने आस्थापित केलेल्या अतिरिक्त ऊर्जा रोहित्र व क्षमतावाढ केलेल्या ऊर्जा रोहित्राचे लोकार्पण आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी माजी मंत्री सुरेश वरपूडकर, महावितरण अधीक्षक अभियंता आर. के. टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता एम. पी. वग्यानी, जी. के. गाडेकर, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, सहायक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू, उप कार्यकारी अभियंता डी. व्ही. गव्हाणे, सहायक अभियंता नागेश डुकरे उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी होती की, दिवसा वीज मिळाली पाहिजे. ही मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सबस्टेशन सोलरवर आणण्यात आले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी असणारी मागेल त्याला सौर कृषी पंपांसाठी ९० टक्के सबसिडी तर अनुसूचित जाती-जमातींसाठी ९५ टक्के सबसिडी दिली जातेय. यामुळे डीपी जळणं, लोडशेडिंगचं प्रमाण कमी झालं आहे. शेतकऱ्यांना मुबलक व योग्य दाबात वीज मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
आपल्या तालुक्यात आरडीएसएस योजनेतून टाकळी, पिंपरी, पिंगळी, त्रिधारा इथे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवले आहेत. आगामी 50 वर्षात जिल्ह्याला विजेची कुठलीच समस्या भासणार नाही या पद्धतीने विकास आराखडा बनवला आहे तसेच, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एक विशेष निधी उपलब्ध करून देणार आहेत. त्यातुन मंजूर करण्यात आलेले परभणी तालुक्यातील नवीन 33 केव्ही उपकेंद्र, जांब आणि सिंगणापूर येथील अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर ही सर्व कामं लवकरच पूर्ण होणार आहेत.
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, या योजनेलाही सबसिडी दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून कुटुंबीयांना विजेची गरज तर भागविता येईलच याशिवाय यातून निर्माण होणारी अतिरिक्त विजेचे पैसे महावितरण आपणास देईल, त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर सोलार पॅनल बसवून घ्यावेत असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.
यावेळी श्री. वरपुडकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक श्री. टेंभुर्णे यांनी केले.
महावितरणच्या ३३/११ केव्ही पेडगाव उपकेंद्रातून १७ गावांतील घरगुती ग्राहक २५००, वाणिज्य ग्राहक २७०, औद्योगिक ग्राहक ७०, शेती ग्राहक ३५०० असे एकूण ६३४० ग्राहकांना वीज पुरवठा देण्यात येतो.
पेडगाव उपकेंद्राची सध्याची क्षमता १० एमव्हीए (२०५ एमव्हीए) असून पेडगाव उपकेंद्राची वाढीव क्षमता ५ एमव्हीए (१५ एमव्हीए) आहे. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी २.० या योजने अंतर्गत अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे पेडगाव उपकेंद्राची एकूण क्षमता १० एमव्हीए वरून १५ एमव्हीए झालेली आहे.
११ केव्ही सध्याचे आउटगोइंग फिडर ६ असून ११ केव्ही नवीन आउटगोइंग फिडर २ आहे. सदर वाढीव पावर ट्रांसफार्मर चालू झाल्यानंतर लोड डिव्हाइड होवून वोल्टेज सुधारेल व विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल तसेच सदर उपकेंद्रावर जोडलेल्या गावांना व विद्युत ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेचा वीज पुरवठा मिळेल.
***