नाशिक, दि. २ ऑगस्ट,(जिमाका वृत्तसेवा): पिंपळस ते येवला चौपदरी रस्ता काँक्रीटीकरण कामास अधिक गती देण्यात येऊन काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या.
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पिंपळस ते येवला या ५६० कोटी निधीतून चौपदरी काँक्रीटीकरण रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाची आज निफाड येथे मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. त्यावेळी ते सबंधित अधिकाऱ्यांशी बोलत होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता मयूर मोहिते, शाखा अभियंता दिलीप चौधरी, पांडुरंग राऊत, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री.भुजबळ म्हणाले की, रस्त्याच्या कामाला अधिक गती देत या कामाचा दर्जा देखील उत्तम स्वरूपाचा राहील याची दक्षता घ्यावी. तसेच काम सुरू असताना इतर वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी पर्यायी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
00000