आगामी काळात धुळे जिल्ह्याला अधिक गतीने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू – पालकमंत्री जयकुमार रावल

दोंडाईचा शहरातील विविध विकास कामांचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण संपन्न

धुळे, दि ०२ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचा मागील काळातील विकासाचा अनुशेष भरून काढून धुळे जिल्ह्याला अधिक वेगाने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

लोकनेते विकासरत्न सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दोंडाईचा शहरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अनुपभैय्या अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील, सरकार साहेब रावल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अनिल पवार , कार्यकारी अभियंता संदीप पंडागळे, अप्पर तहसिलदार संभाजी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, बापूसाहेब खलाणे, बबनराव चौधरी, माजी महापौर प्रदीप कर्पे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, मागच्या काळात धुळे जिल्ह्याला स्वजिल्ह्याचा पालकमंत्री नव्हता, त्यामुळे विविध विकास कामे पूर्ण होण्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता जिल्ह्याचा पालकमंत्री तसेच सर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असल्याने तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्या महायुती सरकारचे सशक्त मंत्रीमंडळ आणि केंद्र व राज्यात एकाच विचारांचे सरकार असल्यामुळे जिल्ह्यात अनेक विकासाची कामे होत आहे. दोंडाईचा शहरात करण्यात येत असलेल्या विकास कामासोबतच जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात पुढच्या पाच वर्षांमध्ये विकास कामांची गती अधिक गतीमान होईल. तसेच धुळे आणि नंदुरबार जिल्हे हे विकासापासून  मागे राहिले होते, आता या भागांचा विकास सुनिश्चित करण्यासाठी राज्यस्तरावरील विविध खात्यांच्या मंत्र्यांमार्फत अधिक विकास कामे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने सरकार साहेब रावल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्यात.

धुळे जिल्ह्यात सोलर पार्क उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार – ना. अतुल सावे

धुळे जिल्ह्यात येत्या काळात सोलर पार्क उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असून उद्योजकांनी सोलर पार्कसाठी प्रस्ताव दिल्यास त्यास 24 तासात मंजूरी देण्यात येईल, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढच्या पाच वर्षात देशामध्ये 100 टक्के सोलरायझेशन करण्याचा संकल्प आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी म्हणून प्रधानमंत्री कुसूम योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला सोलर पंप देण्यात येत आहे. राज्यात 75 हजार सोलर पंपाचे टेंडर काढले असून पुढच्या तीन महिन्यात  दीड लाख सोलरचे टेंडर काढण्यात येणार आहे. यामुळे येत्या काळात शेतकऱ्याला सोलरच्या माध्यमातून 24 तास वीज मिळणार असून त्यांचा वीजेचा प्रश्न कायमचा सोडविण्यात येणार आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी, त्यांच्या वडिलांचा वाढदिवस, कुठलाही जल्लोष न  करता, लोकोपयोगी उपक्रम तसेच विविध विकास कामांचे लोकार्पण घेऊन साजरा केल्याबद्दल तसेच सरकार साहेब रावल यांच्या संकल्पनेतून उभा राहणा-या ऑक्सिजन पार्कचेही कौतूक मंत्री अतुल सावे यांनी केले.

धुळे जिल्ह्यात टेक्सटाईल पार्कसाठी सर्वतोपरी मदत करणार – ना. संजय सावकारे

जिल्ह्यात नव्याने येणाऱ्या टेक्सटाईल कंपन्याना आपले उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दोंडाईचा येथे केले. जिल्ह्यात  उद्योगांसाठी अतिशय पोषक वातावरण असून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात टेक्सटाईल उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्योजक उत्सुक असून त्यांना शासनामार्फत सबसीडी, जमीन, पाणी, वीज व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात देवून येत्या काळात येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात टेक्सटाईल हब बनविण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, रावल कुटूंबाने नेहमीच समाज हितास प्राधान्य दिले आहे. त्यांचे आजोबा दादासाहेब रावल मुंबई प्रातांचे आमदार होते. त्याकाळी त्यांनी जिल्ह्यात अनेक विकासाची कामे केलीत. त्यांचा विकासाचा वारसा घेऊन सरकार साहेबांनंतर जयकुमार रावल हे मतदार संघात व जिल्ह्यात अनेक विकासाची कामे करीत आहे. दोंडाईचा शहरात येणाऱ्या पिढीसाठी 26 एकरावर ऑक्सिजन पार्क, प्रशस्त रस्ते, पुल अशी कामे वाखाण्याजोगी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुपभैय्या अग्रवाल, विकासरत्न सरकारसाहेब रावल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

विकास कामांचे लोकार्पण आणि वृक्षारोपण

 प्रारंभी पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पितृछाया ऑक्सिजन पार्क येथे 11 हजार वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर अमरावती नदीवरील पर्यायी पूल (19 कोटी ), जुना शहादा रोड (जयपथ ) रोड (26 कोटी ) चे लोकार्पण संपन्न झाले.

यावेळी मान्यवरांनी शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन कार्यालयास भेट देवून तेथे पाहणी केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता स्व. मनीष वाघ यांना श्रद्धाजंली अर्पण केली. कार्यक्रमांस मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

000000