घरगुती, वाणिज्यिक व शेती प्रवर्गातील ग्राहकांना विनाखंडित वीज पुरवठा होणार : मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण संपन्न  

नाशिक, दि. ०२ (जिमाका वृत्तसेवा): राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला ग्रामीण उपविभाग अंतर्गत नवीन ५ एम. व्हि. ए. क्षमतेचे  ३३/११ के.व्हि बल्हेगाव उपकेंद्र, जळगाव नेऊर येथे तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, येवला येथील मंडळ अधिकारी कार्यालय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच येवला शहरातील जुनी नगरपालिका इमारत सिटी येथे वाणिज्य संकुल बांधणे तसेच इतिहास संग्रहालय व अनुषंगिक कामे, अंबीयाशाह कॉलनी, येवला येथे शादिखाना पूरक बांधकाम, सुशोभीकरण व अनुषंगिक कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, कृषी अधिकारी शुभम बेरड, मंडळ अधिकारी जयश्री शेटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही के आव्हाड, महावितरण विभागाचे अभियंता संजय तडवी, उपअभियंता श्री.जाधव, शहर अभियंता श्री. राजेंद्र सुतावने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, बल्हेगाव उपकेंद्रातून १०० ॲम्पियर क्षमतेचे दोन फिडर शेतीसाठी व बल्हेगाव-एजी, नागडे -एजी आणि बल्हाळेश्वर गावठाण असे तीन फिडर तयार झाले आहेत. याचा फायदा बल्हेगाव, नागडे व धामणगाव येथील गावे, शिवार आणि वडगाव, कोटमगाव गावठाण परिसरातील घरगुती, वाणिज्यिक व शेती प्रवर्गातील ग्राहकांना विनाखंडित वीज पुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, महावितरण कंपनीकडे अजून नवीन 33/11 के. व्ही. उपकेंद्र प्रस्तावित केलेले आहेत. यात सोमठाण देश, पिंपळगाव जलाल, चिचोंडी  एमआयडीसी व जऊळके साठी प्रत्येकी 5 एम. व्ही. ए. च्या उपकेंद्रांचा समावेश आहे. सोमठाण देश व पिंपळगाव जलाल येथील उपकेंद्रांसाठी एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून निधी उपलब्ध होणार आहे. सावरगाव येथे अतिरिक्त 5  एम. व्ही. ए., कोटमगाव येथे 5 एम. व्ही. ए. चा ट्रांसफार्मर बदलून 10 एम. व्ही. ए. प्रस्तावित असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

सारोळे येथे 400 के.व्ही. अतिउच्च दाब उपकेंद्रास मंजूरी मिळाली असून त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.  पुढील महिन्यात अंगुलगाव येथील विद्युत उपकेंद्राचे लोकर्पण होत असून येवला शहर विद्युत उपकेंद्रातील 5 एम.व्ही.ए. च्या रोहित्राची क्षमता 10 एम.व्ही.ए करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. 33/11 के व्ही. कोटमगाव येथील उपकेंद्रासाठी उंदीरवाडी येथे दोन मेगाव्हेटचा सोलर प्लांट उभारला जात असून लवकरच कार्यान्वित होईल. यामुळे कोटमगाव उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांना दिवसा शेतीपंपासाठी वीज उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे सत्येगाव येथे मुखेड उपकेंद्रांतर्गत नऊ मेगावॅट क्षमतेचे सोनल सोलर प्लांट उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने सोलर प्लांट विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून मूलबक प्रमाणात वीज उपलब्ध होईल, अशी माहिती मंत्री छगन  भुजबळ यांनी यावेळी दिली.

या कामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले भूमिपूजन व लोकार्पण

जळगांव नेऊर, ता. येवला येथे आगमन व तलाठी कार्यालय व निवासस्थानाचे बांधकाम करणे कामाचे लोकार्पण (र.रु.३३ लक्ष)

पालखेड इरीगेशन कॉलनी, येवला येथे आगमन व येवला शहर मंडल अधिकारी कार्यालय निवासस्थानाचे बांधकाम करणे कामाचे लोकार्पण (र.रु.३७ लक्ष)

बल्हेगांव, ता. येवला येथे आगमन व कृषी आकस्मितता निधी मधील नवीन ३३/११ के. व्ही. विद्युत उपकेंद्र स्थापन करणे कामाचे उद्घाटन (र.रु.३६७.८८ लक्ष)

जुनी नगरपालिका, येवला येथे आगमन व येवला शहरातील जुनी नगरपालिका इमारत सिटी सर्व्हे क्र.४५३६ ते ४२५२ येथे वाणिज्य संकुल बांधणे तसेच इतिहास संग्रहालय व अनुषंगिक कामाचे भूमिपूजन (र.रु.४.९९ कोटी)

अंबीयाशाह कॉलनी, येवला येथे आगमन व शादिखाना पूरक बांधकाम, सुशोभीकरण व अनुषंगिक कामाचे भूमिपूजन (र.रु.१५० लक्ष)