जळगाव तहसील कार्यालयात प्रतीक्षालय, वाचनालय, सेतू केंद्र व क्षेत्रीय अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण

जळगाव, दि.२ (जिमाका): नागरिकांना अधिक सुसंस्कृत, सुलभ व सकारात्मक शासकीय सेवा मिळाव्यात या उद्देशाने जळगाव तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या प्रतीक्षालय, वाचनालय, सेतू सुविधा केंद्र व क्षेत्रीय अधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतींचे लोकार्पण आज जलसंपदा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी पालकमंत्री पाटील म्हणाले की, “तहसील कार्यालय हे नागरिकांच्या थेट संपर्कातील महत्त्वाचे कार्यालय असून येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस शांत, सुसंस्कृत व आदरयुक्त वातावरण मिळणे आवश्यक आहे. नव्याने सुरु झालेल्या सुविधांमुळे शासकीय सेवांची प्राप्ती अधिक सोपी होणार असून प्रशासनाबद्दलचा नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल.”

या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार सौ. शितल राजपूत, नायब तहसीलदार राहुल वाघ, डी. बी. जाधव, मंडळ अधिकारी अजिंक्य आंधळे, अभिजीत येवले, महसूल प्रशासनातील अधिकारी, सेतू केंद्राचे कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक तहसीलदार शितल राजपूत यांनी केले. आभार नायब तहसीलदार राहुल वाघ यांनी मानले.

नवीन प्रतीक्षालयात नागरिकांच्या मनःशांतीसाठी सुमधुर संगीत व्यवस्था उपलब्ध असून वाचनालयात विविध हलकीफुलकी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. यामुळे प्रतीक्षा करताना नागरिकांना एक सकारात्मक अनुभव मिळणार आहे.

या उपक्रमामुळे शासकीय कार्यालयांचे वातावरण अधिक मैत्रीपूर्ण, आधुनिक व सुसंस्कृत होत असल्याचे दिसून येते. या सुविधा केवळ इमारतींच्या विकासापुरत्या मर्यादित नसून, त्या प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे व नागरिकांप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे.

०००