- महसूल दिनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर
- उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार
- लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व अनुदानाचे वाटप
बुलढाणा, दि. १ (जिमाका): महसूल विभागाच्या कार्यक्षमतेचा गौरव करत, जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी महसूल दिनानिमित्त विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांचे मनोबल वाढवले. महसूल विभाग हा शासनाचा कणा असून, जनतेला पारदर्शक व तत्पर सेवा देण्यासाठी या विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केले.
महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे समस्या जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याचे निर्देश, पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित महसूल दिन कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर तांबे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, डॉ. जयश्री ठाकरे, समाधान गायकवाड, उपमुख कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल व विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना महसूल विभागाच्या कार्याची सखोल प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, “शासन आणि जनतेच्या दरम्यान विश्वासाचे सेतू बांधण्याचे काम महसूल विभाग करत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचे हक्क, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत, विविध शासकीय योजना आणि नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंधित निर्णय या विभागाच्या माध्यमातून घेतले जातात. त्यामुळे शासकीय कामामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा अधिक परिणामकारक बनवण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. पालकमंत्र्यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीचे कौतुक करत, पारदर्शकता, जबाबदारी आणि तत्परता या गुणांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच शासकीय कामकाज करताना पालकमंत्री म्हणून मी, सदैव अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले की, महसूल विभाग विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असून शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवले जात आहेत. दि. ४ ते ६ ऑगस्ट या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत नागरिकांच्या तक्रारीवर तात्काळ उपाय केले जातील, असे त्यांनी सांगितले. नागरिकांचे, शेतकऱ्यांचे कामे प्राधान्याने, पारदर्शक व गतिमानतेने करा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी महसूल दिनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘ई महसूल प्रणाली माहिती पुस्तिका’चे ऑनलाईन प्रकाशन पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा महसूल प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी वनहक्क पट्टे, नझूल भूखंड वाटप, जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत लाभार्थ्यांना सातबारा वितरण आदींचे वाटप करण्यात आले.
उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांनी प्रास्ताविकात महसूल दिन व सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तहसिलदार वृषाली केसकर यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी केले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह देवून करण्यात आला. यामध्ये उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, तहसिलदार भुषण पाटील, तहसिलदार वृषाली केसकर, नायब तहसिलदार एस.एस.वट्टे, सहा.म.अधिकारी दिपक भाष्कर, महसूल सहायक जे.एन.वाघ, मंडळ अधिकारी संजय दिनकर जोशी, मंडळ अधिकारी शिवाजी भरगडे,ग्राम महसुल अधिकारी अमोल हिरालाल राठोड, वाहन चालक अशोक देवकर,शिपाई रामेश्वर शिंदे,महसूल सेवक तौफिकखान अब्दुलखान पठाण,पोलीस पाटील योगेश मधुकर पाटील, तसेच उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी म्हणून तहसिलदार संतोष काकडे, सहा.म.अधिकारी पल्लवी राठोड, मंडळ अधिकारी किशोर पाटील, महसूल सेवक आर.एन.अडकणे यांचासह भूमी अभिलेख विभाग, सह निंबधक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आला.
०००