नैसर्गिक आपत्तीसंदर्भात तत्काळ मदत करा – मंत्री मकरंद जाधव पाटील

पालकमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा; प्रशासनाला निर्देश

बुलढाणा, दि. १ (जिमाका): जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या  नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची मदत पोहोचवण्याचे व पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

पालकमंत्री मकरंद जाधव पाटील म्हणाले, “नैसर्गिक आपत्ती ही अनपेक्षित असली, तरी नागरिकांवर त्याचे परिणाम गंभीर असतात. अशावेळी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने प्रतिसाद द्यावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना कुठलाही अडथळा न होता शासकीय मदत तातडीने पोहोचली पाहिजे. नुकसानीचे वर्गीकरण करुन पंचनाम्याचे काम झपाट्याने पूर्ण करा. जिल्हाधिकारी यांच्या अधिकार क्षेत्रातील नुकसानीचे मदत तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावावी. तसेच शासन स्तरावरील प्रस्ताव सादर करावा, जेणेकरून अनुदान व भरपाई तत्काळ मंजूर होऊ शकेल.

बैठकीत पूरस्थितीग्रस्त, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली शेती, घरांचे नुकसान, रस्ते वाहतूक तसेच वीज आणि पाणी पुरवठा या बाबींची सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच एप्रिल ते जून 2025 या कालावधीत अवेळी पाऊस, गारपीठ व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे मदत येत्या आठ दिवसात लाभार्थ्यांना मिळेल यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री जाधव पाटील यांनी यावेळी दिले.

०००