पुणे, दि. ३१: जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणारा मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी क्रांतीकारी ठरत असून, या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था येथे स्मार्टच्यावतीने आयोजित विभाग व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीण देवरे, स्मार्ट प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, अतिरिक्त संचालक उदय देशमुख, आत्मा प्रकल्प संचालक सुनील बोरकर तसेच विविध जिल्ह्यांतील कृषी अधिकारी व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कृषी ॲड.कोकाटे म्हणाले, शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रकल्प उभारणीसाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात शासन सक्रिय भूमिका बजावत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि कृषी समृद्धी योजना यांच्या समन्वयातून भांडवली गुंतवणूक करुन शेतकऱ्यांचा सर्व समावेशक विकास साधला जाणार आहे. शेतकऱ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन व तांत्रिक मार्गदर्शन करीत बाजारपेठेची उपलब्धता करण्याकरिता संपूर्ण सहकार्य करण्यात येईल.
कृषी माल प्रक्रिया करण्याकरिता साठवणूक क्षमता वाढविणेकामी विविध प्रकल्प मान्यता दिली आहे. गुणवत्तापूर्ण व मागणीअनुरूप उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि जनजागृतीसाठी प्रयत्न करण्यात येईल. वाढवण बंदर सारखी सुविधा शेतमाल निर्यातीसाठी उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत प्रक्रिया केलेल्या कृषी मालाला चांगला भाव मिळावा यासाठी बायर सेलर मीट घडवून आणली त्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच कृषी मॅाल उभारुन शेतकऱ्यांच्या मालाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
स्मार्ट प्रकल्पामुळे राज्यातील शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत असून, हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी मिळून ठोस आणि कालबद्ध कार्ययोजना आखावी. आगामी काळात महाराष्ट्राचे कृषी क्षेत्र देशात अग्रगण्य करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, डॉ. कोकाटे म्हणाले.
कृषी राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले , स्मार्ट प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल झाला आहे. शेतकरी उत्पादक कंपनींचा सहभाग निर्णायक ठरतोय, असेही जयस्वाल म्हणाले.
प्रकल्प संचालक डॉ. वसेकर यांनी पीपीटीद्वारे अंमलबजावणी आराखडा, सामाजिक समावेशन, सीबीओ मार्गदर्शन, शेतमाल बाजाराशी जोडणी, वित्तीय सुलभता आणि शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीओ) धोरण २०२५ यासह विविध बाबींचे सविस्तर सादरीकरण केले. श्री. सुनील बोरकर यांनी अंमलबजावणी यंत्रणेच्या कामकाजाबाबत सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या शेवटी राज्यातील शेतकरी उत्पादक कंपनी संचालकांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सूचना गांभीर्याने घेऊन शासन सकारात्मक पावले उचलेल, असे आश्वासन ॲड. कोकाटे आणि श्री. जयस्वाल यांनी दिले.
0000