‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. ४, मंगळवार दि. ५, बुधवार दि. ६ आणि गुरूवार दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत दोन भागांमध्ये प्रसारित होणार असून, या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार, दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी व दुसरा भाग मंगळवार, दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. तसेच ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या खाली दिलेल्या अधिकृत समाजमाध्यमांवर देखील पाहता येणार आहे.

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

ही मुलाखत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यामागचा ऐतिहासिक प्रवास तत्कालीन सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी अत्यंत सुसंगतपणे मांडला आहे. या ऐतिहासिक निर्णयामागील राज्यशासनाची दूरदृष्टी, प्रभावी समन्वय, सांस्कृतिक जाणीव आणि वारसा संवर्धनातील बांधिलकी या पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. या अनुषंगाने राज्य शासनाचे नियोजन, प्रयत्न, समन्वय, धोरणात्मक निर्णय तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे जागतिक स्तरावरील महत्त्व याविषयी ‘दिलखुलास’व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्याच्या या प्रवासात संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, वन विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग व पुरातत्त्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. हे यश या सर्व प्रक्रियेत संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून शक्य झाले असल्याचे अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी

‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सांगितले आहे.

000