मुंबई, दि. ३१ : ‘समस्त महाजन’ या संस्थेच्या ‘अर्हम अनुकंपा प्रोजेक्ट’ अंतर्गत मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील गोमाता आणि इतर प्राण्यांच्या सेवेसाठी असलेल्या सुपर स्पेशालिटी प्राणी रुग्णवाहिकेचे लोकार्पण पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त गिरीश शहा, विश्वस्त परेश शहा, तसेच समस्त जैन समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘समस्त महाजन’ या संस्थेच्या अर्हम अनुकंपा प्रोजेक्टअंतर्गत सुरू करण्यात आलेली ही प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज रुग्णवाहिका मुंबई, ठाणे, आणि पालघर या भागांतील गोमाता व इतर जखमी प्राण्यांवर उपचार करणार आहे.
समाजातील विविध गोशाळांमधील जखमी, आजारी गायी व इतर प्राण्यांना दवाखान्यात नेण्यासाठी हायड्रोलिक रुग्णावाहिका महत्त्वाचे ठरणार आहे. प्राणीमात्रांचे दुःख दूर करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. प्राणीमित्रांची सेवा हेच मुख्य ध्येय ठेवून भविष्यातही हा उपक्रम अधिक व्यापक व्हावा, अशी अपेक्षा पशुसंवर्धन मंत्री श्रीमती मुंडे यांनी व्यक्त केली.
‘समस्त महाजन’ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून प्राणी कल्याण, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवा क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेकडून मोफत प्राणी उपचार, आहार वाटप, वृक्षारोपण, तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत अशी विविध कार्ये नियमितपणे केली जात आहेत. संस्थेच्या वतीने आतापर्यंत गोमाता व इतर अशा ९२,५०० जखमी प्राण्यांवर मागील ३६ महिन्यांत उपचार करण्यात आले आहे.
0000
नंदकुमार वाघमारे/विसंअ