नाशिक विभागात ‘महसूलदूत’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार: डॉ. प्रवीण गेडाम

महाविद्यालयीन युवक-युवतींद्वारे शासकीय योजना पोहोचणार घरोघरी

नाशिक, दि. ३१ : नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत दिनांक १ ते ७ ऑगस्ट, २०२५ या कालावधीत महसूल विभागातर्फे महसूल सप्ताह राबविण्यात येणार आहे. या योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्तालयाने ‘महसूलदूत’ ही संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. संपर्काची आवड असणाऱ्या इच्छुक महाविद्यालयीन युवक युवतींना महसूलदूत म्हणून शासनाच्या या उपक्रमात सहभाग घेता येणार आहे. संबंधित महसूल विभाग अथवा तहसील कार्यालय क्षेत्रात अथवा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये हे महाविद्यालयीन युवक-युवती महसूलदूत म्हणून काम करणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.

महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि पुरविण्यात येणाऱ्या सेवांविषयी लोकजागृतीच्या दृष्टीकोनातून प्रत्येक महाविद्यालयातील एक कार्यशील युवक व युवती यांची नेमणूक त्यासाठी करण्यात येणार आहे. यासाठी तालुकापातळीवर संबंधित तहसीलदार, अपर तहसीलदार हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये, महाविद्यालये, आयटीआय आदींच्या प्राचार्यांशी चर्चा करुन कार्यशील, उत्तम नेतृत्वगुण आणि तंत्रज्ञान वापराची आवड असणाऱ्या युवक आणि युवतींची निवड करण्याबाबत कळविण्यात आले असल्याचेही डॉ. गेडाम यांनी सांगितले.

महसूल विभागाच्या कामकाजामध्ये तरुणांचा सहभाग वाढावा, महसूल विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी युवकांच्या कल्पकतेचा वापर या विविध योजनांत्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व्हावा यासाठी डिजीटल क्राटप सर्वे प्रणालीद्वारे पीक पाहणी नोंदविणे, ई हक्क प्रणालीचा 11 प्रकारच्या फेरफार नोंदी सातबारावर घेण्यासाठी वापर करणे, महसूल विभागामार्फत शैक्षणिक व नोकरीसाठी आवश्यक प्रमाणपत्र/दाखले यांच्यासाठी लागणारे कागदपत्रे व प्रक्रिया यांची माहिती देणे, महसूल विभाग राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देणे याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूलदुतांना गौरविण्यात येणार असल्याचेही महसूल आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले.  0000