‘पीएम जनमन’ आणि ‘धरती आबा’ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून आदिवासी विकासाला गती द्या – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

योजनांच्या लाभापासून एकही आदिवासी माणूस वंचित राहू नये

आदिवासी संस्कृतीचे आदर्श दर्शन, प्रदर्शन आणि सादरीकरण व्हावे

 गडचिरोली, दि. ३० जुलै (जिमाका):  गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी ‘पीएम जनमन’ आणि ‘धरती आबा’ या केंद्र सरकारच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, अहेरी व भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री जनजातीय न्याय महाअभियान व धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत लाभार्थी मेळावा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत कार्यालयीन इमारत, शालेय इमारत व मुलींचे वसतीगृह, गडचिरोली प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रम शाळा सोडे, रेगडी, कारवाफा येथील मुला-मुलींच्या वसतीगृहाचा लोकार्पण तसेच शासकीय आश्रम शाळा घाटी,  येरमागड, भाडभिडी, अंगारा येथील मुला-मुलींचे वसतीगृह, अहेरी प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रम शाळा बाम्हणी, गुड्डीगुड्डम येथील मुला-मुलींचे वसतीगृह, भामरागड प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा कोठी, जांबीया येथील मुलांच्या वसतीगृहाच्या बांधकामाचा भूमिपूजन मंत्री डॉ. उईके यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. तसेच नीति आयोग अंतर्गत आकांक्षीत तालुका व जिल्हा संपूर्णत:अभियान सन्मान सोहळा आणि रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन येथील सुमानंद सभागृहात पार पडले.

आमदार सुधाकर अडबाले, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी विकास विभाग नागपूरच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा अहेरीचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा भामरागडचे प्रकल्प अधिकारी नमन गोयल, चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे (आदिवासी) कार्यकारी अभियंता नितीन मुत्यालवार प्रामुख्याने उपस्थित होते.

धरती आबायोजनेचे १०० टक्के अंमलबजावणीचे लक्ष्य:

‘धरती आबा’ योजनेची गडचिरोली जिल्ह्यातील ४११ गावांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन डॉ. उईके यांनी केले. येत्या १५ तारखेला होणाऱ्या ग्रामसभांमध्ये या योजनेचे नियोजन केल्यास राज्यात गडचिरोली जिल्हा ‘धरती आबा’ योजनेत १०० टक्के अंमलबजावणीसह पहिला क्रमांक पटकावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी ग्रामसभांनी आतापासूनच नियोजनाचा कृती आराखडा तयार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून सुरू केलेल्या या योजनांमधून २५ पेक्षा अधिक लाभ १७ विभागांद्वारे देण्यात येणार आहेत. या योजनांच्या लाभापासून एकही आदिवासी माणूस वंचित राहणार नाही, याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शिक्षण आणि संस्कृतीला प्राधान्य:

पुढील महिण्यात पात्र शिक्षकांची आश्रम शाळांमध्ये नियुक्ती होईल आणि त्यामुळे शाळेची गुणवत्ता अधिक सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, येत्या काळात इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रम शाळाही सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले. प्रत्येक अधिकाऱ्याने एक आश्रम शाळा किंवा वसतीगृह दत्तक घेऊन तेथील अडचणी सोडवाव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.

बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी, १५ नोव्हेंबर रोजी, आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आदिवासी संस्कृतीचे आदर्श दर्शन, प्रदर्शन आणि सादरीकरण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यात उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करून विकासाची वाटचाल सुरू असल्याचे मंत्री उईके यांनी नमूद केले. ‘विकसित भारत’ सोबत ‘विकसित महाराष्ट्र’ होण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन डॉ. उईके यांनी यावेळी केले.

आमदार डॉ. नरोटे यांनी आदिवासी विभागाचा जास्तीत जास्त निधी शेती, सिंचन व शिक्षणावर खर्च व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली, तर आमदार अडबाले यांनी आदिवासी विभागात पदभरतीचा मार्ग मोकळा केल्याबद्दल मंत्री डॉ. उईके यांचे आभार मानले. आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांनी केले. तर संपूर्णत: अभियान सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी केले. यावेळी वनधन केंद्र देवराईचे संचालक सुरेश पुंगाटी, केळीगट्टा वन हक्क समितीचे अध्यक्ष सोमनाथ गावळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश आणि पीएम जनमन आवास योजनेअंतर्गत गृहप्रवेशाच्या चाव्या वितरित करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे संचालन अनिल पोटे व शेषराव नागमोती यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहायक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार यांनी केले. एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल चामोर्शीच्या मुलींनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर केले.

कार्यक्रमाला आदिवासी विकास विभाग नागपूरचे उप आयुक्त डिगांबर चव्हाण, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी ,माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, समाजसेविका कुसुमताई आलाम ,भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, प्रशांत वाघरे, प्रकाश गेडाम, बाबुराव कोहळे, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, वर्धाचे प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ, चिमूरचे प्रकल्प अधिकारी प्रवीण लाटकर, भंडाराचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, नियोजन अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार, वासुदेव उसेंडी, दादाजी सोनकर, मुकेश गेडाम, सुधीर शेंडे, संतोष कन्नाके , कार्तिक कोवे, प्रकाश अक्यमवार व प्रकल्प कार्यातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.

0000