छत्रपती संभाजीनगर, दि.३०, (विमाका) :- छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील गुंठेवारी नियमितीकरण योजनेतर्गत प्राप्त प्रस्तावाला महानगर प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी मंजूरी दिली. या बाबतचा मंजूरी आदेश आज योजनेचे पहिले लाभार्थी श्री. साहिल चितलांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी सहमहानगर नियोजनकार रविंद्र जायभाये व उपमहानगर नियोजनकर श्री अक्षय ठेंग उपस्थित होते.
महानगर प्राधिकरण क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या गुंठेवारी नियमितीकरण योजनेमुळे नागरीकांना खरेदी-विक्री व्यवहार, तसेच बँकेचे कर्ज घेण्यास सुलभता येणार आहे. त्यामुळे प्राधिकरण क्षेत्रातील पात्र लाभार्थी नागरीकांनी गुंठेवारी नियमितीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी केले आहे.