परळी वैजनाथ बाजार समितीच्या विकासाचा प्रस्ताव पणन मंडळाकडे पाठवावा – पणन मंत्री जयकुमार रावल

VIRENDRA DHURI

मुंबई, दि. ३० : परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन जागेचा विकास करून तेथे अत्याधुनिक बाजार समिती निर्माण करण्यासाठी पणन मंडळाकडून अल्प व्याज दरात कर्ज तसेच केंद्र शासनाच्या योजनांचे साहाय्य देण्यात येईल. यासंदर्भातील प्रस्ताव पणन मंडळाकडे पाठविण्यात यावा, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडावून संदर्भात मंत्री श्री. रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सहव्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे, पणन संचालक विकास रसाळ, मार्कफेडचे व्यवस्थापक महेंद्र ढेकळे यांच्यासह परळी वैजनाथ बाजार समितीचे सभापती व सचिव उपस्थित होते.

मंत्री श्री. रावल म्हणाले की, परळीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेचा उत्तमप्रकारे विकास करण्यासाठी पणन मंडळ सर्वतोपरी सहकार्य करेल. यासाठी पीपीपी मॉडेल, स्मार्ट अंतर्गत योजना, केंद्र सरकारच्या योजना व पणन मंडळाचे कर्ज या माध्यमातून विकास करण्यात येईल. तसेच वखार महामंडळाला एक एकर जागा देण्यात येईल. असे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आले. वखार महामंडळाने जुन्या जागेवरील गोडावून खाली करण्यासाठी प्रस्ताव व नवीन गोडवून वखार महामंडळाला देण्यासाठी पणन संचालक यांच्याकडे एकत्रित प्रस्ताव सादर करावा, अशीही चर्चा यावेळी झाली.

आमदार श्री. मुंडे म्हणाले की, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेचा विकास करून राज्यातील सर्वात आदर्श बाजार समिती करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी पणन मंडळाने कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्या जागेवरील गोडावून वखार महामंडळाला भाडेतत्वावर देण्यात आले आहे. त्यांचा करार संपला आहे. तसेच तेथील गोडावूनही जुनी झाली आहेत. त्यामुळे वखार महामंडळाला नवीन बाजार समितीच्या ठिकाणी एक एकर जागा देण्यात येईल. तेथे नवीन गोडावून तयार होईपर्यंत बाजार समितीच्या गोडावूनमध्ये वखार महामंडळाला जागा देण्यात येईल.

0000

नंदकुमार वाघमारे/विसंअ