मुंबई, दि. ३० : अहिल्यानगर जिल्ह्यात अधिकाधिक सिंचन क्षेत्र निर्माण व्हावे यासाठी जिल्ह्यातील बांधकामांधीन सिंचन प्रकल्प, योजनांच्या कामांना गती द्या, अशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित सिंचन योजनांच्या कामांचा जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा घेतला. या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, सह सचिव प्रसाद नार्वेकर, संजीव टाटू, उपसचिव अलका अहिरराव आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, उपसा सिंचन योजना, कालवे यांची सिंचन क्षमता वाढली पाहिजे. सिंचन योजना, कालव्यामधील पाण्याची गळती रोखणे महत्त्वाचे आहे. यासाठी जलसंपदा विभागाने कालबद्ध पद्धतीने कामे करावीत.
या बैठकीत कुकडी कालवा, प्रवरा कालवा, गोदावरी खोऱ्यातील पाटचऱ्याची कामे तसेच टप्पा-२ मध्ये घेण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधा यांसह महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम अंतर्गत कालव्यावरील वितरण व्यवस्थेचे नूतनीकरण करण्याबाबत आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
०००००
एकनाथ पोवार/विसंअ