प्राप्त तक्रारी लवकरात लवकर सोडवण्याचे आदेश
नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
सिंधुदुर्गनगरी दि. २६ (जिमाका) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे सर्वांना घटनात्मक अधिकार मिळाले आहेत. सामान्य माणसाला मिळालेले अधिकार आबाधित राहिले पाहिजे. आज लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी ,अधिकारी म्हणून जी खुर्ची किंवा अधिकार आपल्याला प्राप्त झाले आहेत ते वंचित घटकांच्या, जनतेच्या सेवेसाठी, त्यांचे भविष्य घडविण्यासाठी आहेत. समाजातील वंचित घटकांच्या अडीअडचणी दूर करुन त्यांना न्याय मिळवून देणे हेच आपले कर्तव्य असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ‘वंचित घटकांसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
या जनता दरबारात २०० पेक्षा जास्त तक्रारी, निवेदन नागरिकांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमोर मांडले. पालकमंत्र्यांनी देखील तात्काळ दखल घेत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करत अनेकांचे प्रश्न सोडविले.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, वंचित घटकांसाठी आज जो ‘जनता दरबार’ आयोजित केलेला आहे, हा एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. आपल्याला वंचित समाजाच्या प्रत्येक घटकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायचे आहे. वंचित घटकांना न्याय देणे हे आपले कर्तव्य आहे. परंतु आपण जनतेच्या अडी अडचणी सोडवत नसल्याने त्यांना जनता दरबारामध्ये येऊनच न्याय मागण्याची वेळ येत असेल तर प्रत्येकांनी याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. आजच्या दरबारात नागरिकांनी एखादा दाखला मिळत नाही, जमिनीवर अतिक्रमण झाले आहे असे आपणाला लहान वाटणारे प्रश्न परंतु त्यांच्या आयुष्यामधील ते महत्त्वाचे आहेत. परंतु असे प्रश्न देखील आपण सोडवू शकत नसू तर ही बाब प्रशासन म्हणन योग्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे सरकार पारदर्शक आणि लोकांचं आयुष्य घडवणारे सरकार आहे. लोकांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असणार आहोत. आज जे निवेदन, तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सोडवाव्यात. या तक्रारी पुन्हा माझ्याकडे येणार नाहीत याची संबंधित विभाग प्रमुखांनी गांभीर्यांने दखल घ्यावी. आजच्या दरबाराच्या माध्यमातून वंचित घटकांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. परंतु काही प्रश्न हे धोरणात्मक असल्याने ते शासनाकडे पाठविले जाणार असून पालकमंत्री म्हणून त्या प्रस्तावाचा पाठपुरावा मी करणार असल्याचेही ते म्हणाले.
पुढे पालकमंत्री म्हणाले की, पालकमंत्री म्हणून मी नेहमीच आपल्या जिल्ह्यात नवनवीन प्रयोग करण्यावर भर दिला आहे. प्रशासनामध्ये ए.आय. चा प्रभावी वापर हा प्रयोग आता इतर जिल्ह्यांमध्ये देखील अंगिकारला जात आहे. आजचा जनता दरबाराची देखील नक्कीच दखल घेतली जात असून काही दिवसांनी हा पॅटर्न इतर जिल्ह्यात देखील राबविण्यात येईल असेही ते म्हणाले.
०००००