माण-खटाव तालुक्यातील विविध विकास कामांचा ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आढावा

सातारा दि.25 :  माण तालुक्यातील भोजलिंग, टाकेवाडी, वारुगड येथील वन विभागाच्या हद्दीतील रस्ते करण्यासाठी निधी प्राप्त आहे, तरी वन विभागाने परवानगीचा विषय त्वरीत मार्गी लावावा, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

माण खटाव तालुक्यातील विविध विकास कामांसंदर्भात मंत्री श्री. गोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी आमदार अतुल भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सार्वजनिक  बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहूल अहिरे, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमर नलावडे आदी उपस्थित होते.

या बैठकीत खटाव तालुक्यातील कटगुण आणि भोसरे येथील पर्यटन विकास आराखडे तात्काळ जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत. माण तालुक्यातील शिंगणापूर, म्हसवड तर खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली आणि पुसेगाव यांचे ब वर्ग तिर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश मंत्री श्री. गोरे यांनी दिले.

माण तालुक्यातील आंधळीचे महालक्ष्मी मंदिर व पांगारीचे बिरोबा मंदिर व फलटण तालुक्यातील मरुम येथील मल्हारराव होळकर यांचे जन्म स्थळ या यात्रास्थळांना क वर्ग यात्रा स्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्याबाबतही त्यांनी संबंधितांना निर्देश दिले.

यावेळी माण व खटाव तालुक्यातील पाझर तलावांचा गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येईल. त्यासाठी जिल्हा नियोजन सर्व साधारण योजनेततून इंधनासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, असेही त्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले.

000