मुंबई, दि. 25 : शासनाचे काम गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होण्यासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. यासाठी तलाठी, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनी जनसंवाद, लोकशाही दिन, लोकअदालत आदी माध्यमातून आणि विशेष शिबिरे आयोजित करुन नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्या अडचणी सोडवाव्यात, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित कामांचा आढावा मंत्री श्री. बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत 30 लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करुन लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. घरकुलांना वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी 30 एप्रिल रोजीच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. भूमि अभिलेख विभागाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन घ्यावा. पाणंद, शिवपाणंद रस्ते 12 फुटांचे करुन त्यांना क्रमांक द्यावेत तसेच दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात यावी. अर्धन्यायिक प्रकरणांच्या सुनावण्यांसाठी लोकअदालतीसारखे उपक्रम राबवून सर्व सुनावण्या येत्या तीन महिन्यात पूर्ण कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
जिवंत सातबाराअंतर्गत नोंदी अद्ययावत करणे, तुकडेबंदी, शेतरस्ता, भोगवटादार 2 मधून 1 मध्ये करण्याची तसेच आकारी पड जमिनीची प्रकरणे, स्वामित्व योजनेचा लाभ देणे आदी कामे विषयानुसार शिबिरांचे आयोजन करुन कालबद्धरितीने मार्गी लावावीत, असे निर्देश महसूलमंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या गौण खनिजांचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करावे असे सांगून ज्यांनी अवैध उत्खनन केले असेल त्यांच्याविरोधात महसूल आणि पोलीस विभागामार्फत कारवाई करण्याचे आदेश मंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा यादृष्टीने ॲग्रीस्टॅक मध्ये नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्यासह जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांनी यावेळी सुरू असलेल्या विविध कामांचा अहवाल सादर केला.
००००
बी.सी.झंवर/विसंअ/