सांगली, दि. २४ (जि. मा. का.) – सांगली जिल्ह्यातील आळते (ता. तासगाव) आणि कार्वे (ता. खानापूर) या दोन गावामधील अनेक वर्षांपासून अतिक्रमित असल्याने बंद असलेला शीवरस्ता विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या पुढाकाराने व दोन्ही गावच्या सरपंचांच्या सहकार्याने खुला करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या ठिकाणी भेट देऊन समाधान व्यक्त केले.
आळते आणि कार्वे या दोन गावांच्या हद्दीवरील खानापूर तासगाव रस्त्यापासून सुरू होऊन ओढा पर्यंत जाणारा अंदाजे दोन किलोमीटरचा रस्ता बऱ्याच वर्षापासून बंद होता. यामुळे शेतकऱ्यांना ये-जा करण्यास तसेच शेतामध्ये मोठी अवजारे आणि वाहने नेण्यास अडचणी येत होत्या. या कारणाने त्यांच्या उत्पन्नावरही परिणाम होत होता. या रस्त्याची शासकीय तसेच खाजगी मोजणी होऊन सुद्धा शेतकऱ्यांमध्ये त्या रस्त्याबाबत एकमत होत नव्हते. दोन्ही तालुक्यांच्या हद्दीवरील रस्ता हा या खानापूर व तासगाव या दोन तालुक्यांच्या शीवेवरचा हा रस्ता खुला झाल्याने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी आळते गावचे सरपंच बालाजी मोहिते आणि कार्वे गावचे सरपंच बाळासो जाधव यांची भेट घेऊन याकामी पुढाकार घेतल्याबद्दल दोघांचे तसेच शेतकऱ्यांचे कौतुक केले. यासोबतच त्यांनी इतर शेतकऱ्यांनीही सामंजस्याची भूमिका घेऊन महसूल प्रशासनाच्या मदतीने अधिकाधिक रस्ते खुले करून घ्यावेत तसेच त्या रस्त्यांची सात बारावर नोंद करून घ्यावी, असे आवाहन केले.
यावेळी विटा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल आणि खानापूर – विटा तालुक्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे, कार्वे गावच्या शेतकरी तसेच पोलीस पाटील ज्योत्स्ना पाटील, अमित पाटील, रोशन जाधव व आळते गावचे माणिक सूर्यवंशी उपस्थित होते.
000