मुंबई दि. २४ :- महाराष्ट्र आता थांबणार नाही…! महाराष्ट्र सर्वच महत्त्वाच्या आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे. असा अहवाल जगातील गुंतवणूक बँकिंग तसेच वित्तीय संशोधन क्षेत्रातील ख्यातनाम वित्तीय संस्था असलेल्या मॉर्गन स्टॅनले यांनी प्रकाशित केला आहे. या अहवालात महाराष्ट्र अनेक क्षेत्राचे नेतृत्व करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालाचे तसेच त्यातील निष्कर्षांचे स्वागत केले आहे. हा अहवाल, त्यातील हे निष्कर्ष म्हणजे आपल्या राज्याने विविध क्षेत्रांसाठी स्वीकारलेले धोरण आणि त्यानुसार सुरू असलेली सकारात्मक वाटचालीचे द्योतक आहे. यातून महाराष्ट्रावरचा विश्वास व्यक्त झाला आहे. त्यामुळे या अहवालाचे आणि या संस्थेचे मनापासून आभार. यात आर्थिक विकास, पायाभूत सुविधा सामाजिक न्याय, वित्तीय शिस्त, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा यांसह विविध क्षेत्रांतील कामगिरीची दखल घेतली गेली आहे.
महाराष्ट्राने २०३० पर्यंत वन ट्रिलीयन डॉलर्स म्हणजेच एक लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याचा संकल्प केला आहे. या दिशेने आपली दमदार पाऊले पडत असल्याचे, हा अहवाल म्हणजे निदर्शक आहे. मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालातून महाराष्ट्राच्या दिमाखदार वाटचालीवरच प्रकाश टाकला गेला आहे. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचे मनापासून अभिनंदन!!! असेही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
0000