मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या योजना, उपक्रम व महामंडळाची कार्यपद्धती याविषयी डॉ. गोंदावले यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात संवाद साधला आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 25, शनिवार दि. 26, सोमवार दि. 28 आणि मंगळवार दि. 29 जुलै 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 दरम्यान आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. ही मुलाखत निवेदिका सुषमा जाधव यांनी घेतली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार खते, किटकनाशके, कृषी अभियांत्रिकी उपकरणे व पशुखाद्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासन सातत्याने सकारात्मक पावले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळामार्फत रासायनिक व जैविक किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, तसेच प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक यंत्रसामग्री शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. या माध्यमातून शेती अधिक उत्पादनक्षम, सुरक्षित आणि शाश्वत होण्यास हातभार लागणार आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून महामंडळाच्या कार्याचा विस्तृत आढावा, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती आणि आगामी योजनांचा दृष्टिकोन प्रभावीपणे उलगडण्यात आला आहे.
०००