मुंबई, दि. २३ : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर गृह मंत्रालयाने २२ जुलै २०२५ रोजीच्या राजपत्र अधिसूचनेद्वारे यास अधिकृत मान्यता दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने घटनेच्या अनुच्छेद ३२४ अंतर्गत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे आयोजन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निवडणुकीचे आयोजन ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२’ व त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक नियमावली, १९७४’ च्या अधीन राहून केले जाते.
उपराष्ट्रपतीपदाच्या २०२५ मधील निवडणुकीसाठी आयोगाने आवश्यक तयारीस आरंभ केला असून, ही प्रारंभिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच निवडणुकीच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
या निवडणुकीपूर्वी करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या कार्यवाहीमध्ये लोकसभा व राज्यसभेतील निवडून आलेले आणि नामनिर्देशित सदस्य यांचा समावेश असलेल्या निर्वाचक मंडळाची तयारी, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक आणि पूर्वी झालेल्या सर्व उपराष्ट्रपती निवडणुकांचे संदर्भ साहित्य तयार करणे व प्रसारित करणे या गोष्टींचा समावेश आहे, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000
संजय ओरके/विसंअ/