मुंबई विद्यापीठातील ८७ अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यास मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक

मुंबई, दि. २३ : मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या ८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत. या निर्णयास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्रालयात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांसाठी १५० दिवसांच्या उद्दिष्टांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. या अंतर्गत आकृतीबंध अद्ययावत करणे, नियुक्ती नियम (Recruitment Rules) सुधारित करणे आणि अनुकंपा तत्वावरील भरती १०० टक्के करण्यावर भर देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित नियुक्त्यांचा आढावा घेऊन त्या संदर्भात कालबद्ध नियोजनानंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात आल्या आहेत. तसेच, सध्या रिक्त असलेल्या अनुकंपाच्या जागांचा पुन्हा आढावा घेऊन तातडीने उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अशा सर्व रिक्त जागा १०० टक्के भराव्यात, असे निर्देशही मंत्री श्री.पाटील यांनी बैठकीत दिले.

00000

काशीबाई थोरात/विसंअ