मुंबई, दि. २३ : महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला गौरवशाली इतिहास आहे. देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचा ६० टक्के वाटा आहे. महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीमध्ये या सहकारी संस्थाचा मोलाचा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय सहकारीता वर्षानिमित्त सहकार क्षेत्रातील उत्कृष्टरित्या काम केलेल्या संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार हा अत्यंत चांगला उपक्रम असल्याचे गौरवोद्गार सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी काढले.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दि.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनतर्फे २६ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर बोलत होते.यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, दि.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष भाऊ कड, उपाध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शंकरराव घोणसे यासह राज्यातील विविध सहकारी बँकाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले की,सहकाराच्या माध्यमातून साखर उद्योग सह शेतीला पूरक विकास झालेला आहे.सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांनी अत्यंत उत्कृष्टरित्या काम केलेले आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक सहकारी संस्था काम करत आहेत ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. अनेक संस्था शेतकऱ्यांसाठी शेती भवनची निर्मिती, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत हे कौतुकास्पद आहे. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यामुळे समाजोपयोगी कामे होत राहतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्राला बळकटी मिळत आहे.
यावेळी सन २०२३-२४ चे कै.विष्णु अण्णा पाटील जीवन गौरव पुरस्कार, श्रीमती सुशीलादेवी देशमुख स्मृती महिला पुरस्कार(संपूर्ण महाराष्ट्र), सहकार महर्षी कै.बाळासाहेब घुईखेडकर उदयोन्मुख तरुण सहकारी कार्यकारी पुरस्कार(संपूर्ण महाराष्ट्र), कै.वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार, राजमाता जिजाऊ उत्कृष्ट महिला सहकारी बँक, लोकनेत कै.राजारामबापू पाटील उत्कृष्ट शेड्युल/मल्टी स्टेट नागरी सहकारी बँक पुरस्कार, पदभूषण कै.वसंतदादा उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कार, १०० कोटी रूपये पर्यंत ठेवी असलेल्या बँका, १०० ते २५० कोटी पर्यंत ठेवी असलेल्या बँका, २५० ते ५०० कोटी रूपयापर्यंत ठेवी असलेल्या बँका, ५०० ते १००० कोटी रूपयापर्यंत ठेवी असलेल्या बँका, १००० कोटी ते १५०० कोटी रूपयापर्यंत ठेवी असलेल्या बँका, पगारदार नोकरांची नागरी सहकारी बँक पुरस्कार, शतकोत्तर वाटचाल-विशेष सन्मान, कै.बाबुरावजी देशमुख उत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार दि.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, नामदार कै.भाईसाहेब सावंत स्मृती उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, कै.बापुरावजी देशमुख उत्कृष्ट नागरी सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार, नागरी सहकारी बँका या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.
*****
संध्या गरवारे/विसंअ/