मागास भागातील समुदायाचे कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने एटापल्ली तालुक्यात बाएफ संस्थेमार्फत कार्यान्वित प्रकल्पामुळे रोजगार संधीत वाढ, समुदाय कल्याण पूरक उपक्रमात स्थानिकांचा सक्रिय सहभाग

मुंबई दि. २३ : राज्य शासनाच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात कॉर्पोरेट फाउंडेशनच्या आर्थिक मदतीने बाएफ (BAIF) द्वारे  राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसरातील स्थानिक रोजगार संधी विस्तारण्यास पूरक वातावरण निर्माण होत आहे. याद्वारे येथील नागरिकांचे जीवनमान उंचावून समुदायाचे कल्याण आणि समृद्धी साधणे ही उद्दिष्टे साध्य होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला कृतीशील प्रतिसाद देत कॉर्पोरेट फाउंडेशनच्या सहकार्याने बाएफ संस्थेमार्फत गडचिरोली जिल्ह्यात  विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यात स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मागास असलेल्या एटापल्ली  या आकांक्षित तालुक्यात समन्वित उपजिविका विकास कार्यक्रम एटापल्ली तालुक्यातील २० गावात राबविण्यात येत आहे. याची  प्रायोजक संस्था  SBI फाउंडेशन आहे. १ एप्रिल २०२५ पासून पुढील ३ वर्षेपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी  एकूण खर्च: ₹४.९५ कोटी अपेक्षित असून यामध्ये १५०० लाभार्थी कुटुंबे समाविष्ट आहेत. निवडलेल्या गावांमध्ये हवामान सुसंगत आणि शाश्वत शेतीला चालना देऊन, उपजिविकेच्या संधी वाढवून आणि जीवनमान उंचावून समुदायाचे कल्याण आणि समृद्धी साधणे ही प्रमुख उद्दिष्टे असून प्रमुख उपक्रमांद्वारे ही  उद्दिष्टे साध्य केली जातील.याअंतर्गत हवामान सुसंगत व शाश्वत शेतीचा प्रसार, बोडी आधारित शेती प्रणालीचा प्रसार,  मृदा व जलसंधारण, जलस्रोत विकास, बोडीमध्ये अंतर्गत मत्स्यपालन, महिला उद्योजकता विकास व संस्था निर्मिती, समुदाय आरोग्य, स्वच्छता व पोषण या बाबींचा समावेश आहे.

मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी प्राधान्याने या भागात समुदाय कल्याणास विशेष लक्ष दिले असून २०२५-२६ या वर्षासाठी ३० जून २०२५ पर्यंत ५०० कुटुंबांची नोंदणी करण्यात आली आहे. १५ बोडी (नैसर्गिक शेतीतलाव) गाळमुक्त करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे शेतीसाठी उपयुक्त पाणीसाठा वाढवण्यास मदत झाली आहे. बोडी आधारित शेती पद्धतीत माशांचे संगोपन, बोडीवर कुक्कुटपालन  आणि बोडीतील पाणी शेतीसाठी वापरले जाते. ही पद्धती पाण्याचा कार्यक्षम वापर करते आणि विविध उपजिविका स्रोत प्रदान करते.

२०२७-२८ पर्यंत या प्रकल्पात सहभागी कुटुंबांना व्यापक लाभ होईल. त्यांच्या मूळ उत्पन्नाच्या तुलनेत उत्पन्न दुप्पट होईल, यामुळे शेती उत्पादकता वाढेल, उपजिविका संधी उपलब्ध होतील, शेतकरी गटांच्या माध्यमातून सामूहिक खरेदी-विक्री व्यवस्था निर्माण होईल, तसेच पोषण आणि आरोग्य विषयक जनजागृतीमुळे जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्यासही सुरुवात होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पाठपुराव्याला कॉर्पोरेट फाउंडेशनच्या सहकार्याने BAIF संस्थेमार्फत कृतीशील प्रतिसाद मिळत असल्याचे प्रेरणादायी चित्र गडचिरोली जिल्ह्यात बघायला मिळते आहे.

—()—

संध्या गरवारे/विसंअ/