गडचिरोली, दि. २२ (जिमाका) : राज्यात सर्वांधिक वनाच्छादित अशा गडचिरोली जिल्ह्याची ओळख ‘महाराष्ट्राचे फुफ्फुस’ म्हणून आहेच, परंतु आता हा जिल्हा देशातील सर्वाधिक हरित व वनाच्छादित जिल्हा बनविण्याचा संकल्प मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील एक कोटी वृक्ष लागवडीचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, वन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव मिलिंद म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल, मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, उपवनसंरक्षक श्रीमती आर्या आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०१४ ते २०१९ या काळात राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वी झाली होती, ज्याचा सकारात्मक परिणाम केंद्र सरकारच्या अहवालात नमूद आहे. याच अनुभवाच्या जोरावर आता ११ कोटी वृक्ष लागवडीपासून पुढे २५ कोटी वृक्ष लागवडीपर्यंतचा टप्पा राज्य सरकारने निश्चित केला असून, त्या दिशेने पावले टाकली जात आहेत. महाराष्ट्राचे वनसंतुलन गडचिरोलीमुळेच राखले गेल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
गडचिरोलीच्या या जल, जंगल, जमीन समृद्ध नैसर्गिक संपदेचे संतुलन राखून औद्योगिक आणि पर्यावरणपूरक विकास साधायचा असल्याचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, यावर्षी गडचिरोलीत ४० लाख आणि पुढील वर्षी ६० लाख झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे ‘कोट्यधीश’ वृक्षसंख्येचा मान मिळवणारा गडचिरोली हा देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे. नियमित वृक्षारोपणासाठी येथेच नर्सरीदेखील विकसित करण्यात येत आहे. यासोबतच येथील लॉईड्स व जेएसडब्ल्यु या दोन उद्योगांना प्रत्येकी २५ -२५ लाख वृक्षरोपणाचे स्वतंत्र उद्दिष्ट देवून हरित गडचिरोलीत सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
वृक्ष लागवडीनंतर त्यांचे संगोपनही तितकेच महत्त्वाचे असल्याने या रोपांची पुढील एक वर्ष तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देखरेख केली जाणार आहे. तसेच, वनाच्छादनवाढीचा मासिक, सहामाही आणि वार्षिक अहवाल घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अतिदुर्गम भागातील जिमलगट्टा आणि देचलीपेठा या पोलीस ठाण्यांच्या नवीन प्रशासकीय इमारतींचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यावेळी नक्षलग्रस्त भागातील पोलिस शहीदांच्या २३ पाल्यांना पोलिस दलात सामावून घेण्यात आले, त्यापैकी पंकज मेश्राम व मीना हेडो यांना प्रतिकात्मक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द केला.
कार्यक्रमास महसूल, वन, कृषी विभाग तसेच अन्य संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000