मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांनी महाराष्ट्राला अल्पावधीत प्रगतीपथावर नेले, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या ‘महाराष्ट्र नायक’ या विशेष कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे हस्ते राजभवन येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची कॉफी टेबल बुकची निर्मितीची संकल्पना अभिनंदनीय असल्याचेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, योगेश सागर, मंगेश चव्हाण, देवयानी फरांदे, अनुप अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ‘जलयुक्त शिवार अभियान’ योजना राबवण्यात आली, ज्यामुळे २२,००० हून अधिक गावांमध्ये जलसुरक्षा प्राप्त झाली. तसेच, नागपूर-मुंबई शहरांना जोडणारा ‘समृद्धी महामार्ग’ हा भविष्यकालीन दृष्टीकोन असलेला प्रकल्प साकारला गेला. महाराष्ट्राने सेवा हक्क कायदा लागू केला आहे.त्यामुळेच ‘आपले सरकार’ ही तक्रार निवारण प्रणाली आणि सेवा हक्क कायदा नागरिकांना शेकडो सेवा घरपोच देत आहे, असे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.
राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, श्री.फडणवीस यांच्या गतिशील नेतृत्वाखाली, महाराष्ट्र २०१६ मध्ये देशात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक (FDI) आकर्षित करणारे राज्य ठरले, जे देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या जवळपास निम्मे होते. पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्राधान्यामुळे मुंबई मेट्रोचे विस्तार प्रकल्प, ‘अटल सेतू’ सागरी पूल, तसेच शासकीय-खासगी भागीदारीद्वारे शहरी व ग्रामीण विकासाला चालना मिळाली. राज्यात सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने ‘ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान’ आणि दुर्बल घटकांसाठी सीएसआरअंतर्गत प्रभावी उपक्रम राबवण्यात आले. महाराष्ट्रात लवकरच वाढवणमधील खोल समुद्रातील बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जपान सरकारच्या साहाय्याने सुरू असलेली बुलेट ट्रेन योजना हे तीन ऐतिहासिक प्रकल्प साकारले जाणार असल्याचेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जपान, सिंगापूर, जर्मनी व अमेरिका येथे महत्त्वाच्या राजनैतिक भेटी दिल्या, ज्यातून तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा व शाश्वत विकासात जागतिक भागीदारी निर्माण झाली. त्यांच्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम – दावोस’मधील सहभागामुळे महाराष्ट्राला जागतिक व्यासपीठावर मान्यता मिळाली, ज्यामुळे १५ लाख कोटी रुपयांहून अधिक सामंजस्य करार झाले. आणि १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला. कधी काळी नक्षलवादग्रस्त गडचिरोली जिल्हा — आज ‘स्टील डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया’ म्हणून ओळखला जातो, या परिवर्तनाचे संपूर्ण श्रेय श्री. फडणवीस यांना जात असल्याचेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.
राजकीय जीवनापलीकडे, श्री. फडणवीस एक मूल्यप्रिय, कुटुंबवत्सल, आध्यात्मिक आणि विचारशील व्यक्तिमत्त्व आहे. राज्यातील कोट्यवधी महिलांच्या जीवनात ‘माझी लाडकी बहिण योजने’च्या माध्यमातून एक कोटींहून अधिक महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जात आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक व सामाजिक बळकटी मिळत असून, हा सन्मान, आत्मनिर्भरतेचा आणि भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आदर्श ठरला आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसनिमित्त त्यांनाही शुभेच्छा दिल्या.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या कामाचा गौरव, त्यांच्यासोबतचे अनुभव, प्रभावशाली नेतृत्वाची ओळख या कॉफीटेबल बुकच्या माध्यमातून सामान्य जनतेला होईल. त्यांचा अनुभव, प्रवास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम या पुस्तकाच्या माध्यमातून होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार केले आहे. महाराष्ट्रासाठी स्वप्न बघितले असून ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या सोबत तत्परतेने राहू, असे ॲड. नार्वेकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या नवपरिवर्तनाचे “महाराष्ट्र नायक” – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विविध क्षेत्रातील कार्य अफाट आहे. महाराष्ट्र राज्याला लाभलेली सुसंस्कृत परंपरा जोपासण्याचे कार्य श्री. फडणवीस यांनी केले आहे, त्यामुळे ते महाराष्ट्राच्या नवपरिवर्तनाचे “महाराष्ट्र नायक” आहेत. त्यांच्या कार्यकाळातील महत्वाच्या निर्णयांचा, त्यांच्यातील विविध पैलूंचा, तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी पुस्तकरूपाने ठेवा असावा या संकल्पनेतून हे कॉफीटेबल बुक साकारले. श्री.फडणवीस यांनी सलग पाच वर्षे महाराष्ट्र राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली आणि राज्याला सर्वच क्षेत्रात शिखरावर पोहोचवले. महाराष्ट्र राज्याचे विकासचक्र अविरतपणे सुरू आहे. सर्वांत तरुण महापौर ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशी देदीप्यमान कारकीर्द असणारे देवेंद्रजी हे कुशल संघटक, अभ्यासू प्रशासक, धुरंदर राजकारणी, कायदेतज्ज्ञ, स्पष्टवक्ते, लढवय्ये आहेत. मार्गदर्शक आणि आदर्श नेता म्हणून देवेंद्रजी यांचा प्रवास एक सहकारी म्हणून अनेक वर्षांपासून जवळून पाहता आला, असेही श्री.महाजन यांनी सांगितले.
या कॉफीटेबल बुकमध्ये अनेक मान्यवरांच्या लक्षवेधी मुलाखती असून त्यात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, अभिनेते आमिर खान, अमृता फडणवीस, श्रीपाद अपराजित, मृणालिनी नानिवडेकर, यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश आहे.
या कॉफीटेबल बुकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून हे कॉफीटेबल बुक साकारले आहे. कॉफीटेबल बुकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य, त्यांची नेतृत्वशैली, विकासाचा दृष्टिकोन, प्रगत महाराष्ट्राचे व्हिजन, विकसित महाराष्ट्र २०४७, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांचे कार्य, जनमानसातील उजळ प्रतिमा, विविध क्षेत्रातील अतुलनीय योगदान, महत्त्वाकांक्षी योजनांचा रिपोर्ताज, देश पातळीवरील विविध जबाबदाऱ्या आणि मिळालेले यश, भविष्यातील मोठ्या संधींसाठी असलेले गुणविशेष आणि क्षमता, कौटुंबिक भूमिकेतील समर्पण, छंद या बाबींचा समावेश आहे.
00000
प्रवीण भुरके/ससं/