मुंबई, दि. २१ :- मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाटचालीचा वेध घेणारे महाराष्ट्र नायक हे विशेष कॉफी टेबल बुक तयार करण्यात आले आहे. या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे हस्ते राजभवन येथे दि. 22 जुलै, 2025 रोजी सकाळी 10.30 वा. करण्यात येणार आहे.
कॉफी टेबल बुक प्रकाशन कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यासह विविध विभागाचे मंत्री यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
या कॉफी टेबल बुक मध्ये अनेक मान्यवरांच्या लक्षवेधी मुलाखती असून त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री श्री. रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अभिनेते आमिर खान, श्रीमती अमृता फडणवीस, श्री. श्रीपाद अपराजित, श्रीमती मृणालिनी नानिवडेकर, यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश आहे.
या कॉफीटेबल बुकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून हे कॉफीटेबल बुक साकारले आहे. कॉफीटेबल बुकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य, त्याचबरोबर त्यांची नेतृत्वशैली, विकासाचा दृष्टिकोन, प्रगत महाराष्ट्राचे व्हिजन, विकसित महाराष्ट्र २०४७, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांचे कार्य, जनमानसातील उजळ प्रतिमा, विविध क्षेत्रातील अतुलनीय योगदान, महत्त्वाकांक्षी योजनांचा रिपोर्ताज, देश पातळीवरील विविध जबाबदाऱ्या आणि मिळालेले यश, भविष्यातील मोठ्या संधींसाठी असलेले गुणविशेष आणि क्षमता, कौटुंबिक भूमिकेतील समर्पण, छंद या बाबींचा समावेश आहे.
0000
एकनाथ पोवार/विसंअ/