बिहारमधील मतदार नोंदणीसाठी केवळ ६.८५ टक्के मतदारांचे फॉर्म बाकी

मुंबई, दि. १६:  भारत निवडणूक आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, बिहारमध्ये आगामी मतदार यादीच्या प्रारूप प्रकाशनासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अद्याप केवळ ६.८५ टक्के मतदारांचे फॉर्म बाकी असून, २५ जुलै २०२५ ही शेवटची तारीख आहे.

बिहारमध्ये एकूण मतदार (२४ जून २०२५ पर्यंत)  ७,८९,६९,८४४ असून आतापर्यंत  ६,९९,९२,९२६ (८८.६५%) फॉर्म सादर झाले आहेत. यापैकी ६,४७,२४,३०० (८१.९६%) अपलोड झालेले आहे.

यात पत्त्यावर सापडले नाहीत असे मतदार  ३५,६९,४३५ (४.५%) मतदार असून  मृत समजले गेलेले १२,५५,६२० (१.५९%) मतदार तर कायमचे स्थलांतर झालेले  १७,३७,३३६ (२.२%) मतदार आहेत.  अनेक ठिकाणी नाव नोंदलेले  ५,७६,४७९ (०.७३%) मतदार आहे. मतदार म्हणून नोंदणीसाठी ५४,०७,४८३ (६.८५%) शिल्लक  फॉर्म आहेत.

विशेष मोहिमा आणि देण्यात येणाऱ्या सुविधा अंतर्गत, २६१ नगरपरिषदांतील सर्व ५,६८३ प्रभागांमध्ये विशेष शिबिरे आयोजित केली जात आहेत. तसेच इतर राज्यात असलेले बिहारचे नागरिक देखील मोबाईलवरून ECINet App किंवा https://voters.eci.gov.in  या संकेतस्थळावर फॉर्म भरू शकतात. भरलेले फॉर्म थेट BLO (Booth Level Officer) कडे किंवा कुटुंबियांमार्फत WhatsApp/इतर माध्यमांनीही पाठवता येतील.

दुहेरी नावनोंदणी, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची माहिती स्थानिक राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्याद्वारे नियुक्त १.५ लाख बूथ एजंट्स यांच्यासोबत उद्यापासून शेअर केली जाणार आहे. यामुळे २५ जुलैपूर्वी खात्री करता येईल की, केवळ पात्र मतदारांचीच नावनोंदणी झाली आहे.

“प्रत्येक पात्र मतदाराची नोंद व्हावी, हे सुनिश्चित करणे ही आपली जबाबदारी आहे. उरलेल्या ६.८५% मतदारांनी त्वरित फॉर्म भरावा.” असे आवाहनही भारत निवडणूक आयोगाने केले आहे.

अधिक माहिती किंवा नोंदणीसाठी https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असेही भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ