अर्धा तास चर्चा
‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करणार –पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. १६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीत महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही. राज्यामध्ये अपूर्ण असलेल्या तसेच सुधारित अंदाजपत्रकांनुसार करावयाच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात दिली.
‘जल जीवन मिशन’ योजनेबाबत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत सदस्य सर्वश्री नाना पटोले, अभिजीत पाटील, बाबाजी काळे, विश्वजीत कदम, नारायण कुचे, किशोर पाटील, हेमंत ओगले, अमित झनक, किसन वानखेडे, श्रीमती सुलभा गायकवाड यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
पाणी पुरवठा विभागाला प्राप्त होणाऱ्या निधीतून सर्व जिल्ह्यांना मागणीनुसार समप्रमाणात निधी वितरण करण्यात येणार असल्याचे सांगत पाणी पुरवठा मंत्री पाटील म्हणाले, पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. प्राप्त निधीचे व्यवस्थित वाटप करून मागील थकीत देयकांची पूर्तताही करण्यात येईल. योजनेच्या विस्तृत प्रकल्प अहवालमध्ये आणखी सुधारणा करणे गरजेच असल्यास सुधारित अंदाजपत्रके स्वीकारण्यात येतील.
या योजनांच्या सद्यस्थितीच्या आढाव्यासाठी चंद्रपूर, भंडारा आणि आवश्यकतेनुसार इतर जिल्ह्यांची बैठक घेण्यात येईल. तसेच प्रत्यक्ष पाहणी दौराही करण्यात येईल. राज्यातील सर्व पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर आणण्यात येत आहे.
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचा सर्व्हे झाला आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून यावर्षीच या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. प्रति माणसी 55 लिटर पाणी गृहीत धरून जल जीवन मिशन योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेच्या कामासाठी खोदलेले रस्ते दुरुस्ती करण्याकरिता सुधारित अंदाजपत्रकात ही बाब समाविष्ट करण्यात येणार आहे, असेही पाणी पुरवठा मंत्री पाटील यांनी सांगितले.
०००
निलेश तायडे/विसंअ