देशाचा समृद्धीसाठी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

नांदेड, दि. १४ : जगात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आपल्या देशाचा सर्वांगिण विकास व  समृद्धीसाठी विद्यापीठे, शाळांनी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढविण्यावर विशेषत्वाने भर द्यावा, अशी सूचना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली.

अभिनव भारत शिक्षण संस्थेच्यावतीने नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात आज राज्यपाल बागडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमास खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे, कोषाध्यक्ष कैलाशचंद्र काला, सचिव ॲड. वनिता जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य एम.वाय. कुलकर्णी आदी मान्यवरांसह  प्राध्यापक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

प्रारंभी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा संस्थेचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

राज्यपाल बागडे म्हणाले की, प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर होता. गुरुकुल परंपरेमुळे विद्यार्थी सर्व विषयात पारंगत होत असे. आज विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढविण्यावर अधिक भर द्यावा. तसेच  ज्ञान केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता इतरांपर्यंत पोहोचविण्याबाबत दक्षता घ्यावी. याशिवाय खेळांवरही भर द्यावा. शाळांमध्ये मैदान हे अवश्य असावे. खेळांमधून मुलांची शारीरिक विकासासह बौध्दीक क्षमताही वाढते. आपला देशात जगात सर्वश्रेष्ठ म्हणून ओळखला गेला पाहिजे, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष पांडे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी मनोगतही व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

०००