स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

छत्रपती संभाजीनगर दि.१४ (विमाका): विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर  यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मतदान केंद्राची संख्या निश्चित करताना काळजीपूर्वक निश्चित करा, असे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, नगरविकास विभागाचे सह आयुक्त देविदास टेकाळे, सहायक आयुक्त संजय केदार तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह नगरप्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान विभागीय आयुक्त पापळकर यांनी जिल्हानिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीबाबत माहिती जाणून घेतली. मतदार संख्या, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम), मतदान केंद्रांची व्यवस्था आणि इतर अनुषंगिक तयारी मतदान केंद्रांची रचना आणि निवडणूक प्रक्रियेच्या तयारी, मतदान केंद्रांवर पाणी, वीज, स्वच्छतागृहे यासारख्या मूलभूत सुविधा, ईव्हीएम सुरक्षितता आदी तयारीचा आढावा घेत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित व्यवस्थेची पाहणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी सबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.

०००