लोहटा-पूर्व गावास महसुली दर्जा देण्याची कार्यवाही महिनाभरात पूर्ण करा –  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि.१४ : धाराशिव, उल्हासनगर, मुंबई उपनगर या ठिकाणांशी संबंधित विविध महसूल विषयांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यामध्ये विशेषतः लोहटा-पूर्व या गावास महसुली दर्जा देण्यापासून ते मालाड येथील दफनभूमीच्या विकासापर्यंतचे विषयांवर चर्चा करण्यात आली.

विधानभवन येथे आयोजित बैठकीत मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी आमदार अस्लम शेख, कैलास घाडगे-पाटील, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, यांच्यासह संबंधीत जिल्हाधिकारी आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पूर्वीच्या बुडीत गावांतील नागरिकांना सध्या त्याचा समावेश लोहटा पुर्वमध्ये करण्यात आलेला आहे.या गावास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात एक महिन्याच्या आत प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. व्हिलेज कोड जनरेट करून शेतकऱ्यांसाठी डिजिटल माहिती प्रणाली कार्यान्वित करावी अशा सूचनाही मंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले.

उल्हासनगरच्या सर्वेक्षणासाठी विशेष समिती स्थापन करावी

उल्हासनगरच्या सर्वेक्षणासाठी विशेष समिती स्थापन करावी. या समितीने एक महिन्यात सर्वेक्षण करून नक्शा स्कीम अंतर्गत अहवाल सादर करावा. सिंधी समाजाच्या ताब्यातील निवासी जागा नियमबद्ध करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा. शासकीय कार्यालये असलेल्या इमारतीमध्ये भूमी अभिलेख कार्यालय स्थलांतरित करावे. याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. मुस्लिम दफनभूमी, हिंदू स्मशानभूमी व ख्रिश्चन दफनभूमीबाबत जिल्हाधिकारी पातळीवर बैठक घ्याव्यात.

मुंबई उपनगरातील अंबोजवाडी परिसरात शासनाच्या पाच एकर जागेवर मुस्लिम दफनभूमी, हिंदू स्मशानभूमी व ख्रिश्चन दफनभूमी यांचा संयुक्त विकास करण्यात यावा.यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर महानगरपालिका, स्थानिक आमदार व संबंधित यंत्रणांबरोबर बैठक घेऊन शासनाकडे अहवाल पाठवावा, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

 

०००००

 

राजू धोत्रे/विसंअ