महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी ‘संजीवनी अभियान’

मुंबई, दि. १४ : हिंगोली जिल्ह्यातील ‘संजीवनी अभियान’ हे आरोग्यविषयक नवचैतन्य निर्माण करणारे ठरत असून कर्करोगावरील लढ्यात एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या संकल्पनेतून महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च 2025 रोजी संजीवनी अभियाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला होता. महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती निर्माण करणे, तसेच कर्करोगाचे लवकर निदान व वेळेत उपचार उपलब्ध करून देणे, हा या अभियानाचा उद्देश आहे.

हिंगोली जिल्ह्यात अभियानाच्या पहिल्या टप्प्यात आशा सेविकांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी जिल्हास्तरावरून महिलांच्या आरोग्य समस्या व कर्करोगाची प्राथमिक लक्षणे लक्षात घेऊन विशेष प्रश्नावली तयार करण्यात आली होती. या सर्वेक्षणामध्ये गर्भाशयमुख, स्तन आणि मुख कर्करोग यासारख्या प्रमुख कर्करोग प्रकारांसाठी संशयित रुग्णांची ओळख पटविण्याकरिता सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये कर्करोग सदृश, बुरशीजन्य, विषाणूजन्य आणि जिवाणूजन्य लक्षणे असणाऱ्या व इतर समस्या असणारे महिला व पुरुष असे एकूण 14,542 व्यक्ती संशयित म्हणून नोंदविण्यात आले. यात 7,911 महिला गर्भाशयमुख कर्करोगासाठी, 2,698 महिला स्तन कर्करोगासाठी व 3,933 स्त्री-पुरुष मुख कर्करोगासाठी संशयित आढळले.

पुढील टप्प्यात या संशयित रुग्णांची सखोल तपासणी करण्यात आली. गर्भाशयमुख कर्करोग संदर्भात एकूण 7,431 महिलांची व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ॲसेटिक ॲसिड चाचणी करण्यात आली. त्यापैकी 659 महिलांमध्ये व्हिआयए पॉझिटिव्ह निदर्शनास आले तर 6,772 महिलांची व्हिआयए तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना स्थानिक बुरशीजन्य जंतू संसर्ग  झाल्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत औषधोपचार करण्यात आले. आजमितीस 659 महिला गर्भाशयमुख कर्करोग संशयित असून त्यापैकी 427 महिलांची गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी तपासणी आणि 73 महिलांची बायोप्सी तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या तपासण्यांमध्ये आजअखेर 4 महिलांमध्ये गर्भाशयमुख कर्करोगाचे निदान झाले आहे.

स्तन कर्करोग संदर्भात, सर्वेक्षणादरम्यान 2,698 महिला संशयित लक्षणे असल्याच्या आढळून आल्या होत्या. त्यापैकी 2,512 महिलांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत क्लिनिकल बेस्ट तपासणी (सीबीई) करण्यात आली. यामध्ये 228 महिलांमध्ये सीबीई पॉझिटिव्ह निष्कर्ष मिळाले, उर्वरित 2284 महिलांची सीबीई तपासणी निगेटिव्ह असून त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत स्तनाशी निगडित इतर समस्या बाबत औषधोपचार देण्यात आले आहे. आज 228 महिला ह्या स्तन कर्करोग संशयित असून यापैकी 22 महिलांची सूक्ष्म सुई पेशी (एफएनएसी) तपासणी करण्यात आली. यात 4 महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे निदान झाले आहे.

मुख कर्करोगाबाबत, 3933 स्त्री व पुरुष संशयित रुग्णांपैकी 3511 व्यक्तींची तोंडाची दृश्य तपासणी  करण्यात आली. त्यामध्ये 109 व्यक्तींमध्ये मुख कर्करोग सदृश लक्षणे दिसून आली. उर्वरित 3402 स्त्री व पुरुष यांना मुखाच्या इतर समस्यांबाबत दंतशल्यचिकित्सक मार्फत शमन उपचार देण्यात आले आहे. 109 स्त्री व पुरुष हे मुख कर्करोग संशयित असून त्यापैकी 18 व्यक्तींची दंतशल्यचिकित्सकांच्या माध्यमातून बायोप्सी तपासणी करण्यात आली असून त्यामधून 12 रुग्णांमध्ये मुख कर्करोग असल्याचे निदान झाले आहे.

संजीवनी अभियानार्तंर्गत आज गर्भाशयमुख कर्करोग संशयित महिलांची संख्या 659, स्तन कर्करोग संशयित महिलांची संख्या 228 व मुख कर्करोग संशयित स्त्री व पुरुष यांची संख्या 109 असे एकूण 996 संशयित कर्करोग स्त्री पुरुष आढळून आले आहेत. आज यात गर्भाशयमुख कर्करोग निदान झालेल्या महिलांची संख्या 4, स्तन कर्करोग निदान झालेल्या महिलांची संख्या 4 व मुख कर्करोग निदान झालेल्या स्त्री व पुरुष यांची संख्या 12 असे एकूण 20 कर्करोग बाधित रुग्ण आढळून आले आहे. या रुग्णांवर उपचार प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला आहे. 427 पैकी 208 रुग्णांवरील गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी तपासणी अहवाल प्राप्त असून यात 23 महिलांचे बायोप्सी तपासणी करणे आवश्यक आहे. त्याबाबत स्त्री रोग तज्ज्ञांमार्फत बायोप्सी घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे, असे हिंगोली जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ/