मुंबई, दि. १४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय 55 वर्षे) यांचे शनिवारी (दि.१२) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. आज मंत्रालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक हेमराज बागुल, संचालक किशोर गांगुर्डे, संचालक डॉ. गणेश मुळे, उपसंचालक गोविंद अहंकारी, उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे, सहाय्यक संचालक संतोष तोडकर यांनी दिवंगत संजय देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला.
दिवंगत संजय देशमुख हे मागील दहा वर्षांहून अधिक काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमध्ये एक प्रभावी दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. संजय देशमुख यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे होते. त्यांच्या अकाली निधनामुळे मोठी हानी झाली. प्रत्येक वेळी मदतीला धावणारे असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या अकाली निधनामुळे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने एक कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला असल्याचे उपस्थितांनी यावेळी नमूद केले.
श्रद्धांजली सभेस सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव समृद्धी अनगोळकर, अवर सचिव अजय भोसले, मा. मुख्यमंत्री यांच्या जनसंपर्क अधिकारी किर्ती पांडे, उपसंचालक वर्षा आंधळे, उपसंचालक सीमा रनाळकर यांच्यासह महासंचालनालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मौन पाळून दिवंगत संजय देशमुख यांना आदरांजली वाहण्यात आली.
०००