मुंबई, दि. १४ : राज्यातील रस्ते सुरक्षेबाबत व्यापक आराखडा तयार करण्यात येणार असून, रस्ता सुरक्षा निधीतून विविध सुधारणा करण्यात येणार आहेत. महामार्गांवर अपघातानंतर तातडीने मदत मिळावी, यासाठी एअर अॅम्बुलन्स सेवा सुरू करण्यात येणार असून, अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज वाहने तैनात केली जाणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
मंत्रालयात विविध विषयासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अवैध अॅप आधारित वाहतूक व्यवस्थेवर कारवाईचा आढावा
सिटी फ्लो व इतर अॅप आधारित अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस संदर्भात दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, नियमबाह्य टॅक्सी, बस वाहतूकीवर कारवाई करण्यात यावी. नियमाने प्रवासी वाहतूक करण्यास कसल्याही प्रकारचे बंधन नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
रस्ता सुरक्षा सर्वेक्षणासाठी एजन्सी नियुक्ती
रस्ते सुरक्षेसंबंधी अचूक आणि सविस्तर माहिती मिळावी यासाठी स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही एजन्सी अपघात प्रवण क्षेत्रांची तपशीलवार माहिती देणार असून, त्यावर आधारित उपाययोजना राबवण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले.
०००
राजू धोत्रे/विसंअ/